Thursday, January 12, 2012

आपल्यासमोरचे नेमके प्रश्न कोणते? शशिकांत सावंत, सोमवार, ९ जानेवारी २०१२

आपल्यासमोरचे नेमके प्रश्न कोणते?
शशिकांत सावंत, सोमवार, ९ जानेवारी २०१२
आत्ता अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा धुरळा खाली बसल्यावर आणि लोकपाल विधेयकावरच्या चच्रेने अंतिम टोक गाठल्यावर भ्रष्टाचाराव्यतिरिक्त असलेल्या इतर प्रश्नांचा विचार करायला हरकत नाही, पण या साऱ्याच प्रश्नांचा विचार प्रसारमाध्यमांमध्ये, चॅनेल्सवर किंवा वृत्तपत्रांत वेळोवेळी होतोच. हे प्रश्न कोणते? अर्थातच यादीच करायची ठरविली तर पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्षापासून बालमृत्यूच्या दरापर्यंत आणि गर्भजल परीक्षेनंतर स्त्री-भ्रूणहत्येपासून वाढत्या महागाईपर्यंत अनेक प्रश्नांची यादी करता येईल, पण वेळोवेळी समाजात प्रकटणारे आणि प्रसारमाध्यमांत विचार केले न जाणारे काही मूलभूत प्रश्न असे आहेत
कॉमनसेन्सचा अभाव - अलीकडेच दोन रुपयांची नवीन नाणी वापरात आणण्यात आली. या नव्या नाण्यांचा आकार जवळपास एक रुपयाच्या नव्या नाण्याइतकाच आहे. परिणामी छोटय़ा छोटय़ा व्यवहारांत उदा. रिक्षा किंवा भाजी घेताना, मोड घेताना प्रत्येक नाणे चाचपून पाहावे लागते. आता पूर्वी होते तसे चौकोन, षटकोन हे वेगळे आकार नाण्यांसाठी का वापरता येऊ नयेत? बरे, या सगळ्या गोंधळामध्ये एक रुपयाचे समजून दोन रुपयांचे नाणे देणे-घेणे या व्यवहारात दिवसाकाठी काही पसे जातातच. बरे हे झाले सरकारचे म्हणजे धोरणे ठरविणाऱ्यांचे. त्यांना कॉमनसेन्सचा वापर करता येत नाही. असे असले तरी सामान्य माणसांचे काय?
वाशीसारख्या ठिकाणी मी राहतो तिथे साधारणपणे उच्चभ्रू आणि साक्षर वस्ती जास्त आहे. आता अशा ठिकाणी रेल्वेच्या रांगेत एका वेळी ५० ते ६० माणसे उभी असलेली दिसतात. खरे रांग न लावता कुपन घेता येते, शिवाय अलीकडे सीव्हीएम कार्ड निघाली आहेत, ज्यात स्वत:च स्वत:चे तिकीट काढता येते, पण या पन्नासजणांमध्ये किंवा रांगा लावणाऱ्या सर्वामध्ये तंत्रज्ञानाच्या वापराची एवढी भीती का? बरे, एका वेळी कुपन काढायला जास्त पसे लागतात, ही अडचण मानता येईल, कारण सीव्हीएम कार्ड शंभर रुपयांखाली मिळत नाही, पण कुपन ३० रुपयांखालीही मिळते. आणि वाशीहून सीएसटीच्या दिशेने, कुल्र्याच्या पुढे कुठलाही प्रवास करायला १६ रुपये लागतात, म्हणजेच कुपन घेतल्यास तुमचे १४ रुपये जास्तीत जास्त अडकून पडतात. ही गुंतवणूक काही पंचवीस मिनिटे रांगेत उभे राहण्यापेक्षा जास्त नाही.
सामान्य कायदेपालनाचा अभाव- पुन्हा वाशीचेच उदाहरण देता येईल. वाशी हे नियोजित शहर असल्याने येथील फुटपाथ मोठे आहेत. परिणामी फुटपाथवरून एका वेळी चार ते पाचजणांना चालता येते असे बहुधा एकमेव शहर असेल, पण वाशीतील बहुतेक सेक्टर्समध्ये फुटपाथवरच गाडय़ा पार्क केलेल्या आढळतात. पुन्हा या गाडय़ांचा आकार आणि ब्रँड पाहिला तर लक्षात येते की, पंचवीस लाखांची गाडी फुटपाथवर पार्क करणाऱ्याला अडाणी कसे म्हणता येईल? पसा, संस्कार आणि सभ्यता यांचे अगदी गणितीय नाते नसले तरी काही वेळा तरी सुसंस्कृतता आणि श्रीमंती याचा संबंध असावा की नाही? हैदराबादसारख्या शहरात माणसे उलटय़ा मार्गाने वेगात स्कूटर चालवितात, पण आता पुणे, नाशिकसकट सर्वच शहरांत हे लोण आले आहे. थोडक्यात, कायदा हा पोलीस समोर असतानाच पाळायचा असतो, याबद्दल आपल्या देशात लोकांना खात्रीच आहे. काही वर्षांपूर्वी एका इंग्रजी सायंदैनिकाने मर्सडिीज बेन्झ भाडय़ाने घेतली आणि त्याचे वार्ताहर त्यातून अनेक पंचतारांकित हॉटेल्सना भेट देऊन आले. त्यांनी असे नोंदविले की, अशी गाडी घेऊन गेल्यावर कोणीही सुरक्षारक्षक तुम्हाला रोखत नाही. अर्थातच सुरक्षेबद्दलचा आपला दृष्टिकोन असा असल्यावर २६/११सारखे प्रकरण घडले तर नवल काय? साधारणपणे व्हीआयपी मंडळींना कुठेही अडविले की ते नाराज होतात. ज्यांना सेलिब्रिटी म्हटले जाते, त्यांचा चेहरा हाच पासपोर्ट असल्याने ते आणि त्यांच्यासोबतच्या मंडळींना न तपासताच पाठविले जाते. थोडक्यात, कायद्यासमोर सर्व माणसे समान असली तरी काही अधिक जवळ आहेत. हे सारे कोणत्या विधेयकाने बदलता येईल?
सर्जनशीलतेचा अभाव- काही तरी निर्माण करता येणे, नव्या कल्पना सुचणे, निर्मितीची क्षमता असणे याला सर्जनशीलता म्हटले जाते. सध्या विविध वाहिन्यांवरून नृत्य, गाणी अशा सो कॉल्ड कलाविषयक ज्या स्पर्धा घेतल्या जातात त्या थोडा वेळ पाहिले तरी लक्षात येते की, या साऱ्यांना कशा तऱ्हेची तरी हुबेहूब नक्कल करणे म्हणजेच कला वाटते. हुबेहूब मायकल जॅक्सन ते हृतिक रोशन, सलमानसारखे नाचणे किंवा हुबेहूब आशा भोसले, कुमार सानू यांचा आवाज काढणे म्हणजेच कला, असे वाटते.
िहदी सिनेमाचे उदाहरण घेऊ. फार कमी िहदी सिनेमे एखाद्या ओरिजिनल कल्पनेवर आधारित असतात. समजा, चुकूनमाकून कथा वेगळी असली तरी त्यातील अनेक युक्त्या, क्लृप्त्या हॉलीवूड ते कोरियन अशा जगभरातल्या चित्रपटांमधून घेतलेल्या असतात.
शिक्षण- गेल्या काही वर्षांत इंटरनॅशनल स्कूल नावाचा एक विचित्र प्रकार उदयाला आलेला आहे, म्हणजे मुलांनी एअरकंडिशन्ड वर्गात बसायचे आणि विद्या संपादन करायची. आज ३० ते ४० वर्षांची असलेली जी मंडळी आपल्या मुलांना अशा शाळेत घालीत आहेत, त्यांनी आपण कसे शिकलो ते आठवून पाहावे. मोठय़ा भावांची पुस्तके आणि प्रसंगी कपडे वापरून शाळेत जाणारी अनेक मंडळी मुलांना मात्र अशा शाळेतच चांगले शिक्षण मिळेल असे का मानतात? आइन्स्टाइन, रामानुजम वगैरे जन्मालाच यावे लागतात. विशिष्ट शिक्षणपद्धती वाव देऊ शकते, पण अशा शिक्षणपद्धती अर्थातच परंपरांवर अवलंबून असतात. उदा. ऑक्सफर्ड, केंब्रिज विद्यापीठ, बनारस िहदू विद्यापीठ, फग्र्युसन, रुईया, रुपारेल अशा ठिकाणी काही परंपरा आढळेल. ही परंपरा अर्थातच खर्च होणारा पसा किंवा श्रीमंती याच्याशी संबंधित नाही. शाळा, कॉलेजच्या प्रयोगशाळांमध्ये अद्ययावत सामग्री, वाचनालयात अद्ययावत पुस्तके असली पाहिजेत यात शंकाच नाही, पण एअरकंडिशन्ड वर्ग आणि आठवडय़ाला नवीन गणवेश हा सोस कुठला आणि याचा शिक्षणाशी संबंध काय?
लहान मुलांना देण्यात येणारे कलाविषयक शिक्षण त्यांच्या मुक्त कल्पनाशक्तीला वाव देणारे हवे. चित्रकलेसारख्या शिक्षणात तर हे अधिकच हवे, पण अलीकडे बहुतेक शाळांमधून मुलांना आऊटलाइन काढून दिलेल्या आकारात रंग भरायला सांगितले जाते. अनेकदा हा रंगही कोणता असावा याची आकृती असते. आश्चर्य म्हणजे शिक्षणतज्ज्ञ आणि चित्रकार यांनी जाहीरपणे भूमिका घेतलेली नाही.
कामाची नावड- साधारणपणे पूर्वी ३१ डिसेंबरची गर्दी कमी असायची. आता ३१ डिसेंबरला बहुतेक मौजमजेची ठिकाणे बुक झालेली असतात. गोव्यासारख्या ठिकाणी विमानाचे भाडे ७२ हजार रुपये व्हावे इतकी गर्दी लोटली आहे. आठवडाभर काम करून वीकेण्डला मौजमजेच्या ठिकाणी जायचे ही खास पाश्चात्त्य त्यातही अमेरिकन परंपरा. मात्र ही मंडळी आठवडाभर राबराब राबत असतात. उलट आपल्याकडे एकूणच कामाची नावड आहे. सरकारी कचेऱ्यांत दुपारी मोकळेपणे भरपूर वेळ जेवण आणि चहाची सुट्टी घेणे, आरामात काम करणे, ते आíथक धोरणांमुळेही फार बदललेले नाही. काही क्षेत्रे अशी असतात की, जेथे घडय़ाळानुसार काम करायला पर्यायच नसतो. हॉस्पिटल्स किंवा अतिमहत्त्वाच्या सेवा यांचा समावेश यात करता येईल किंवा थोडीशी सो कॉल्ड क्रिएटिव्ह क्षेत्रे म्हणजे जाहिरात, चित्रपटनिर्मिती क्षेत्र. यातही दीर्घकाळ काम केल्याशिवाय पर्याय नसतो, पण चांगल्या नोकरीचे वर्णन आपल्याकडे ‘नोकरी चांगली आहे, फार काम नसते’ अशा शब्दांत केले जायचे. आजही परिस्थिती बदललेली नाही. ज्यात झोकून द्यावे असे काम आपल्याला मिळणे आणि तशा प्रकारची पॅशन असणे एकंदरीने अपवादात्मक आहे.
साधेपणा हा गुन्हा- गेल्या काही वर्षांत दोन प्रकारच्या साधेपणाला अडाणीपणा मानले जाऊ लागले आहे. कपडे किंवा राहणीमानात साधेपणा असणे आणि गाडी ते लॅपटॉप अशा गोष्टी. कपडे नीटनेटके असावेत समजू शकते, पण दूरदर्शन सीरिअल्स पाहून अगदी घरातही इस्त्री केलेले कपडे घालून माणसे जेवणाच्या टेबलावर बसू लागली आहेत आणि जाहिराती आणि मीडियामुळे निरनिराळी गॅझेट्स वापरू लागली आहेत. असे अनेक तरुण दिसतात. त्यांच्याकडे टेबलावर घरी आणि ऑफिसात कॉम्प्युटर, लॅपटॉप, आयपॅड असते. पुन्हा मोबाइलमध्ये ई-मेल वगैरे पाहण्याची सोय असते. काही वेळा दोन मोबाइल असतात. साधे आणि सरळ जगता येते ही गोष्ट आपण हरवून बसलो आहोत. पुन्हा धुतलेले आणि परीटघडीचे कपडे वापरणे, यांसारख्या गोष्टी दिसायला ठीक असतीलही, पण एकशे दहा कोटींतील ५५ कोटी माणसे समजा रोज कपडे धुऊन आणि इस्त्री करून वापरू लागली तर..
वर उल्लेखिलेल्या कुणी तरी कायदे मोडत असेल तर त्याला अटकाव करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे किंवा तक्रार करणे ही गोष्ट पुरेशी आहे, पण अशा गोष्टीसाठी किती माणसे पुढे येतात, आणि एकूणच व्यवहारात आणि समाजात आपण बदलणे, कृतिशील आणि सजग असणे हाच उपाय आहे. दुसऱ्या व्यक्तीने येऊन कृती करणे हे भारतीय मनाला मोहक वाटते, पण स्वत: पुढाकार घेणे आणि कृती करणे हाच समस्यांवरील उपाय आहे.

No comments: