Saturday, July 9, 2011

salinger

शशिकांत सावंत - रविवार, १४ फेब्रुवारी २०१०
shashibooks@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
भ्रमणध्वनी: ९८२१७८५६१८
जे. डी. सालिंजरचं नाव मराठी वाचकांना माहीत आहे ते ‘कोसला’शी जोडल्या गेलेल्या ‘कॅचर इन द राय’ या कादंबरीचा लेखक म्हणून.
कुठल्याही मृत्यूनंतर, हुंदके, ठसका, आक्रंदन हे ऐकू येणारच. जगप्रसिद्ध अमेरिकन लेखक जे. डी. सालिंजर यांच्या मृत्यूनंतर मात्र या साऱ्याबरोबरच सुटकेचाही एक मोठा सुस्कारा ऐकू आला असेल. वर्षांनुवर्षे आपल्यावर छोटे-मोठे लेख, पुस्तकं इतकंच काय, पण सालिंजरवर कादंबरी लिहिणाऱ्या लेखकालाही त्यानं कोर्टात खटले ओढून बेजार केलं होतं. ते सारं आता संपलंय. खुद्द सालिंजरनं आपल्या अनेक कथा कडीकुलुपात बंदिस्त करून ठेवल्या होत्या, त्यांनाही आता पुढे कधीतरी सुटकेचा श्वास मिळेल.
जे. डी. सालिंजरचं नाव मराठी वाचकांना माहीत आहे ते ‘कोसला’शी जोडल्या गेलेल्या ‘कॅचर इन द राय’ या कादंबरीचा लेखक म्हणून. ‘कॅचर इन द राय’ या १९५१ साली प्रसिद्ध झालेल्या कादंबरीव्यतिरिक्त ‘नाईन स्टोरीज’ हा कथासंग्रह, ‘फ्रॅनी अ‍ॅड झुई’, ‘सेमूर : अ‍ॅन इंट्रोडक्शन’ ‘हेपवर्थ १६, १९२४ ’ एवढीच पुस्तकं त्याच्या नावावर आहेत. ‘फ्रॅनी अ‍ॅड झुई’ ही दीर्घकथा तर ‘सेमूर’ ही लघु कादंबरी.
केवळ एवढंच लेखन नावावर असलेल्या सालिंजर यांचा जगभर एवढा दबदबा का? गेल्या ५० वर्षांत सालिंजर यांच्या मुलाखती, त्यांच्यावरील लेख, व्यक्तिचित्रं यांची संख्या समकालीनांच्या मानानं फारच कमी आहे. ‘अमेरिकाज फेमस रिक्ल्युज’ अर्थात ‘अमेरिकेचा प्रसिद्ध अज्ञातवासी’ असं त्यांचं वर्णन अमेरिकन मीडिया करीत असे. हे वर्णन इतक्यांदा असे, की जणू लेखनगुणापेक्षा अज्ञात राहणे हाच त्यांचा गुण होता की काय असं वाटावं? सालिंजर यांची ‘कॅचर इन द राय’ १९४६ साली न्यूयॉर्कमध्ये स्लाइट रिबेलियन ऑफ मॅडिसन या नावानं छोटय़ा स्वरूपात प्रसिद्ध झाली. १९५१ मध्ये ती पुस्तकरुपाने बाजारात आली. अमेरिकेत आणि जगभर वाचकांनी ती डोक्यावर घेतली. हजारो-लाखो पुस्तकातून एखादे पुस्तक ‘कल्ट क्लासिक’ या बहुमानाला पात्र ठरते, तसेच काहीसे या पुस्तकाच्या बाबतीतही घडले असे म्हणावे लागेल.
‘डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक’, झेन अ‍ॅण्ड आर्ट ऑफ मोटर-सायकल मेंटेनन्स, रिचर्ड फेनमिनचे ‘शुअर्ली! यू आर जोकिंग मि. फेनमिन’, ‘गॉडफादर’ ही काही इतर उदाहरणे. या पुस्तकांचे वैशिष्टय़ म्हणजे ती केवळ खपाने प्रचंड नसतात. त्यांचा प्रभाव एका पिढीवर सर्वार्थाने पडत असतो. मग तो जाणिवा रुंदाविण्यात असो, सांस्कृतिक घडणीत असो, मानवी मनाचे आकलन खोल नेण्यात असो. हजारो वर्षांच्या संस्कृतीबाबत महाकाव्य जे काम करते, ते अंशभराने का होईना ही पुस्तके करीत असतात.
‘कॅचर इन द राय’ ही पौगंडावस्थेच्या सीमेवर असणाऱ्या तरुणाची कथा. शाळा, कॉलेज, पालक, सरकार, ज्येष्ठ कुटुंबीय या साऱ्यांच्या सततच्या दादागिरीने या वयात मन बंड करून उठतेच; पण या बंडाला मिळालेले निखळ आणि नितळ शल्यरूप म्हणजे ‘कॅचर इन द राय’. खप दरवर्षी अडीच लाख. एकूण साडेसहा कोटी! ‘तुम्हाला सारे ऐकायचेच असेल तर सुरूवातीला तुम्हाला मी कुठे जन्मलो आणि माझं भिक्कार बालपण कसं गेलं आणि मला जन्म द्यायच्या आधी माझे आई-वडील काय करीत, असलं ‘डेव्हीड कॉपर फिल्ड’ टाइप कादंबऱ्यात असतं तसं दळिद्री वर्णन तुम्हाला ऐकायचं असणार. पण मला असल्या गोष्टींनी बोअर होतं. शिवाय दुसरं म्हणजे जर मी माझ्या आई-वडिलांविषयी काही खरंखुरं सांगितलंच तर त्यांना मेंदूचा दोनदा रक्तस्राव होईल. ते या साऱ्याबाबत जरा टची आहेत. विशेषत: माझे वडील. ते छान आहेत वगैरे..’ या परिच्छेदानं ही कादंबरी सुरू होते. ैळँी८ ं१ी ल्ल्रूी ंल्ल िं’’' असं एक वाक्य इथं येतं आणि या प्रकारची वाक्यरचना पुढे अनेकदा येते. ‘तिला तशी कला वगैरेंची चांगली जाणीव होती..’ पण अशी गमतीदार वाक्यरचना हा कादंबरीचा एक घटक झाला. (कोसला’मध्ये हा मायेचा खेळ आलेला आहे. पण ‘कोसला’ ही तशी स्वतंत्र कलाकृती आहे.) नायक होल्डन कॉलिफिल्ड हा पेिन्सल्व्हानियामधील पेन्सी प्रेप या शाळेत आहे. तो ख्रिसमसपूर्वी शाळा सोडतो आणि न्यूयॉर्कमध्ये राहायला जातो. त्या अगोदर तो आपल्या शिक्षकांना भेटतो.. आणि थेट त्याच्या नायकाशी गप्पा सुरू होतात. सातत्याने त्याच्या बोलण्यात येणारी गोष्ट म्हणजे प्रौढांचा ढोंगीपणा, खोटेपणा. उदा. तो म्हणतो आमच्या शाळेची जाहिरात तुम्ही पाहिली असेल. घोडय़ावर बसलेला कुंपणावर उडी घेणारा एक तरुण त्यात दाखवलाय आणि दावा केलाय, की आम्ही इथे १८८८ पासून सर्वाना असे तयार करतो, त्यांचं रुपांतर सुंदर, स्पष्ट विचार करू शकणाऱ्या तरुणात करायला मदत करतो. हे सांगून कॉलिफिल्ड म्हणतो, मी कधी शाळेच्या जवळपासही घोडा पाहिलेला नाही आणि इतर शाळांसारखेच इथे मोल्ड करतात. स्पष्ट विचार करणारे सुंदर तरुण तर मला कधी दिसलेच नाहीत. दोनेक असतीलही.. पण ते जात्याच तसे असणार.
सालिंजरला या नाटकात सहभागी व्हायला, खिल्ली उडवायला आवडतं. स्पेन्सर त्याला सांगतात ‘आयुष्य हा खेळ आहे’ तेव्हा तो गांभीर्याने म्हणतो ‘मला माहीत आहे’ आणि लगेच वाचकांना सांगतो, कसला डोंबलाचा खेळ. धट्टीकट्टी माणसं तुमच्या बाजूने असतील तरच त्याला खेळ म्हणायचं. हा नायक अर्थात अभ्यास, खेळ काहीच गांभीर्यानं घेत नाही. वर्ग बुडवितो, सहज खोटं बोलतो, अगदी साधा रस्ता विचारणाऱ्या माणसालाही तो खोटं सांगून भलत्याच रस्त्याला लावतो. (या बाबतीत त्याचं टॉम सॉयर आणि हकलबरी फिन या पूर्वसुरींशी साम्य आहे. मार्क ट्वेनच्या या नायकांना गांभीर्य सहन होत नाही. प्रार्थनेला दोन मिनिट उभे राहतानाही हकलबरी फिनच्या पायाला खाज येते.) तरीही आपण हे पुस्तक वाचत राहतो, कारण अनेक गोष्टीतला नायकाचा तिरकस दृष्टिकोन हा विचार करायला लावणारा असतो आणि ‘कोसला’ आणि कॅचरमधे हेच तर साम्य आहे. उदा. वाचनाबद्दल तो म्हणतो, मी ‘रिटर्न ऑफ द नेटीव्ह’ वाचलीय. अनेक अभिजात कादंबऱ्या वाचल्यात आणि त्या मला आवडल्या आहेत. काही कॉमिक्स आणि इतर पुस्तके वाचलीत; पण ती मला नॉक आऊट करीत नाहीत. नॉक आऊट पुस्तकं कोणतं, तर जे वाचल्यावर तुम्हाला वाटतं, की याचा लेखक आपला मित्र असायला हवा होता, ते. मी सॉमरसेट मॉमची ‘ऑफ ह्यूमन बाँडेज’ वाचली. ती ठीक आहे; पण ती वाचून काही सॉमरसेट मॉमला फोन करावा इतकी चांगली वाटली नाही..
पूर्ण कादंबरीतून थोडा थोडा नायकाचा परिचय होत जातो. तो सहा फूट उंच आहे, १३ व्या वर्षी त्याने खिडकीच्या काचा फोडून टाकल्या होत्या. त्याचा दोन वर्षांनी मोठा असलेला भाऊ खूप हुषार होता. तो ल्युकेमियाने मरण पावला तेव्हा नायक दहा वर्षांचा होता. त्याला मुली आणि मुलींचा सहवास आवडायचा. (प्रौढ पुरुष आणि तरुण किंवा अल्पवयीन मुलगी यांचं नातं ही सालिंजरच्या साहित्यात पुन: पुन्हा येणारी थीम आहे.) त्याला सर्व गोष्टींचा कंटाळा येतो. तरुण वयातील शारीरिक धसमुसळेपणाचे वर्णन तो चवीने करतो. एके ठिकाणी तो सांगतो ‘मी रात्रभर मद्यपान करू शकतो आणि तरीही ते पचवितो.’ तो भरपूर सिगारेट ओढतो. पण जसजसे आपण वाचत जातो तसतसे लक्षात येते, तो उच्चभ्रू आणि उथळ नाही, तो सजग आणि संवेदनशील आहे. गाडीत भेटलेल्या नन्सशी तो साहित्यावर चर्चा करतो. अन् पुढे म्हणतो, मला सतत भीती वाटत होती, की ‘त्या मला मी कॅथलिक आहे का विचारतील. कॅथलिक माणूस सतत दुसरा कुणी कॅथलिक आहे का हे शोधत असतात.’
आत्यंतिक तपशिलाची आवड हा ‘कॅचर इन द राय’मधील गुण पुढच्याही सर्व लेखनात आहे. एकीकडे तो दैनंदिन जीवनातल्या घडामोडीचे वर्णन तपशिलाने करतो तर दुसरीकडे सतत ‘समिंग अप’ पद्धतीने मागच्या अनुभवांबद्दल सांगत राहतो. नॅचरल हिस्ट्री म्युझियमचं वर्णन तो हजार शब्दांच्या एकाच परिच्छेदात करतो, तर एके ठिकाणी लैंगिक अनुभवाबद्दल बोलताना म्हणतो ‘मी व्हर्जिन आहे, खरंच आहे. व्हर्जिनिटी घालविण्याची संधी काही वेळा मला आली होती; पण तरीही अजून ते जमलेलं नाही. काही तरी गडबड होतेच. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या मुलीच्या घरी असाल, तर नेमके तिचे पालक चुकीच्या वेळी घरी येतील, किंवा ते येतील अशी भीती तुम्हाला वाटत राहील. जर तुम्ही कारच्या मागच्या सीटवर असाल, तर पुढच्या सीटवरची मित्राची ‘डेट’ मागे बघत राहते असं वाटत राहील. त्यांना नेहमीच गाडीत काम चाललंय याचं कुतूहल असतं. तरीही मी अनेकदा तिथपर्यंत पोहोचलो होतो. एकदा तर जवळजवळ पोहोचलोच; पण काहीतरी घडलं. मला आता काय ते आठवतही नाही. पण जेव्हा तुम्ही मुलीशी पूर्णपणे जमवून आणता तेव्हा ती तुम्हाला थांबायला सांगते. माझी अडचण अशी, की मी थांबतो. बरेच जण थांबत नाहीत. मला नाही जमत. त्यांना खरंच थांबायला हवं असतं, की त्या घाबरलेल्या असतात, आणि थांबायला सांगतात- कारण जर काही घडलंच तर दोष तुमच्यावर नंतर टाकता यावा म्हणून- हे कसं सांगणार. काही असो. मी सतत थांबत आलोय.’
या प्रकारची अनुभवकथनातली प्रच्छन्नता हे या कादंबरीच्या तरुण वर्गातल्या लोकप्रियतेचं मोठं कारण होतं; पण सर्वच स्तरातील वाचकांना ही कादंबरी सतत काही तरी देत आलीय. अगदी अभिनेत्यांवरचं हे वाक्य बघा. ‘मला अभिनेते आवडत नाहीत. ते कधीच सर्वसामान्यांसारखे वागत नाहीत. आपण तसे वागतो असं मात्र त्यांना वाटत असतं. त्यातले काही कसबी लोक तसं वागतातही, थोडं सामान्यांच्या जवळ जाणारं. पण बघायला आनंद व्हावा इतकं ते साम्य सांगणारं नसतं आणि अभिनेता खरंच चांगला असला तर त्याला माहीत असतं, की आपण चांगले आहोत आणि त्यानं साऱ्याचा नाश होतो.’
या आणि अशा अनेक वर्णनात कादंबरीकारानं काही शब्द तिरक्या ठश्यात लिहिले आहेत. अमेरिकन व्यंगचित्रात एखाद्या शब्दाचं महत्त्व दाखवायला ही शैली वापरली जाते. ती इथे कादंबरीभर आहे. या कादंबरीव्यतिरिक्त ‘नाईन स्टोरीज’ या संग्रहात नऊ कथा आहेत. ‘परफेक्ट डेज फॉर बनाना फिश’ या कथेत सेमूर हा नामक आत्महत्या करतो. तो आणि त्याचे इतर कुटुंबीय (ग्लास फॅमिली) यांच्या कथा प्रामुख्याने सालिंजरने लिहिल्या. ३० व्या वर्षी सेमूरने केलेल्या आत्महत्येनंतर कुटुंबात त्याचे पडसाद उठत राहतात. ‘परफेक्ट डे’मध्ये सेमूरची पत्नी आईशी ट्रंककॉलवर बोलत असते. सेमूर ठीक आहे ना? असं आई परत परत विचारीत असते. सातत्याने आईच्या प्रश्नांनी ती हैराण होते. इकडे पूर्णपणे वेगळ्या दृश्यात सेमूर मुलीशी खेळताना दिसते. मुलांशी पूर्णपणे फँटसीत नेऊन बोलण्याची त्याची कला, इकडे संभाषणातून येणारे त्याचे विपर्यस्त वर्णन या दोन टोकावर नायक हेलकावतानाच सेमूर खोलीत परत येऊन आत्महत्या करतो. खरं तर शॉर्ट स्टोरी या घाटात एखाद-दुसरा चमकदार क्षण पकडणे अपेक्षित असते आणि ही कथा तो परिणाम करते; पण सालिंजर तिथे थांबत नाही. पुन: पुन्हा हे कुटुंबीय आपल्याला भेटत राहतात. ‘सेमूर अ‍ॅन इण्ट्रोडक्शन’मधून किंवा त्याच कुटुंबातल्या ‘फ्रॅनी अ‍ॅड झुई’ या लघु कादंबऱ्यांतून. यातील फ्रॅनीचे बोलणे पुन्हा एकदा ‘कॅचर इन द राय’मधल्या होल्डेनची आठवण करून देते. पण आधुनिक साहित्यात अभावाने आढळणाऱ्या आध्यात्मिक अनुभवाच्या शोधासाठी ती महत्त्वाची आहे. ‘‘देवाच्या शोधात निघालेल्या साध्या वाटसरूला जानी माणूस भेटतो तेव्हा तो ‘लॉर्ड जिझस ख्राइस्ट, हॅव मर्सी ऑन मी’ हे शब्द सतत उच्चारायला सांगतो. हे शब्द सतत उच्चारत राहिले, की ते छातीच्या ठोक्यांशी एकरूप होतात. प्रार्थना स्वयंपूर्ण बनते आणि तुमच्या सर्वागावर त्याचा गूढ, प्रगाढ परिणाम होतो. तुम्ही बदल होण्यासाठी प्रार्थना करता; पण हे साऱ्या अस्तित्वाचे वेगळे भान तुम्हाला मिळते’ असं प्राध्यापकांची खिल्ली उडविणारी फ्रॅनी सांगते तेव्हा आपण चकित होतो; पण याची कारणे सालिंजरच्या व्यक्तिमत्त्वात शोधता येतात.
‘नाईन स्टोरीज’च्या सुरुवातीला सालिंजरने झेन बुद्धिझममधला एक ‘कोन’ (विशिष्ट पद्धतीचे कोडे) दिले आहे. दोन हातांनी टाळी वाजते. एका हाताने वाजणारी टाळी कशी असेल? हे ते कोडे. पुढच्या दीर्घ कथांमध्ये अनेकदा झेन शिकवणीचा उल्लेख येतो. दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धात सहभागी इतर रशियन, युरोपियन समाजांप्रमाणेच अमेरिकेत मोठी उलथापालथ झाली. विद्ध्वंस आणि संघर्षांनंतर कशावरच विश्वास नाही असं म्हणणारी पिढी आली. १९५० नंतर मुक्त जगण्याचा एक नवीन शोध सुरू झाला. रॉॅक संगीत, मारिमोनासारखी ड्रग्ज, बिट जनरेशनमधल्या अ‍ॅलन गिण्डा बर्ग, कोर्सोसारख्या कवींच्या कविता, जॅक केरुआकचे ‘ऑन द रोड’सारखे गद्य, हिप्पी चळवळ यांनी ५० नंतरचे शतक भरलेले होते. ही सारी मंडळी थोडीशी भावनिक होती. १९५३ नंतर सालिंजरने पूर्ण अज्ञातवास पत्करला. सालिंजरचे सारे नायक-नायिका बुद्धिमान आहेत. आपल्या कथांतून तो ते सतत ठसवताना दिसतो. एकीकडे मीडिया, जाहिरातीचा वाढता प्रभाव चालू असताना, झेन तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतो आणि या मीडियाकडे पाठ फिरवतो. आपल्या खासगीपणावर आक्रमण करणाऱ्या कोणत्याही पत्रकाराला, छायाचित्रकाराला यशस्वी होऊ देत नाही. होल्डेन कॉलिफिल्ड हा कॅचरचा नायक जे. डी. सालिंजरला भेटतो, अशी कल्पना करून लिहिलेल्या कादंबरीच्या लेखकाला त्याने कोर्टात खेचले आणि कोर्टाने हा खासगीपणाचा भंग असल्याचे मान्य केले. झेन बुद्धिझमचा गाभा सहजतेने केलेली ही आराधना आहे. आर्चरीपासून तलवारीच्या युद्धापर्यंतच्या सर्व कला या परिपूर्णतेने करायच्या झाल्या तर एकांतात गुरूच्या साहाय्याने त्याची साधना करायला हवी. तीही बाह्य, बंधने लोभ नाकारून, मठात राहून. मग एक दिवस असा येतो, की साधनेची गरज उरत नाही. आपसूक ‘ते’ घडून येते. (या सर्व प्रक्रियेचे सुंदर वर्णन ‘झेन इन द आर्ट ऑफ आर्चरी’सारख्या छोटेखानी पुस्तकात येते.) अशा सहजपणे ‘येणाऱ्या’ साहित्यावर भर असल्यानेच सालिंजरचे ‘आऊटपूट’ छोटे, चार-पाच पुस्तकात मावणारे राहिले आहे. पण ‘ड्रिम कॅचर’ या त्याच्या मुलीने लिहिलेल्या चरित्रात मात्र अनेक कथांचा उल्लेख येतो, ज्या त्याने कधीच प्रसिद्ध होऊ दिल्या नाहीत.शेवटी सालिंजरचे मोठेपण कशात आहे? ‘फॉर इजम्, विथ लव्ह अँड स्क्व्ॉलर’ या छोटेखानी अप्रतिम कथेत, दुसऱ्या महायुद्धाच्या निर्णायक क्षणासाठी डी-डेसाठी, प्रशिक्षित सैनिक एका तेरा वर्षांच्या मुलीला भेटतो. आई-वडील नसलेली ही मुलगी आपल्या भावासोबत संवादात रंगून जाते. पुढल्या आठवडय़ात तुम्ही इथे येणार का यावर सैनिक उत्तर देत नाही. ती म्हणते ‘म्हणजे तुम्हाला सैनिकी हालचाली गुप्त ठेवायच्यात तर..? सामान्य साध्या संवादातून सालिंजरची पात्रे एकमेकांशी आणि वाचकांशीही संबंध जोडतात. युद्ध संपल्यावर बवेरियात अनेक महिन्यांनी त्याला तिचे पत्र मिळते. आपले घडय़ाळ तिने त्याला भेट पाठवलेले असते आणि सोबत म्हणजे एक अत्यंत उबदार पत्र. युद्धापूर्वीच्या दुपारी झालेली ती भेट नायकाचे भावविश्व हलवून टाकते. ‘कॅचर इन द राय’चा नायक एका सकाळी चर्चमधून येणाऱ्या कुटुंबातील छोटय़ा मुलाला ‘इफ बॉडी कॅच अ बॉडी कमिंग थ्रू द राय’ हे गाणे गाताना बघतो आणि म्हणतो ‘मला त्याने छान वाटलं. माझी निराशा कमी झाली. जीवनातल्या साध्या पण सुंदर क्षणाचं ‘इजम्’ कथेतील वर्णन असो किंवा ‘कॅचर’मधील प्रसंग असोत, निष्ठेने त्यांचा शोध घेऊन ते ठेवण्याचं काम सालिंजरने केलं. त्यासाठी त्याने स्वत:ला बंद करून घेतलं.

No comments: