Saturday, June 4, 2011

बाबा रामदेव आंदोलन

बाबा रामदेव यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केलं आहे. बाबा रामदेव योग शिकवतात. ते मर्सिडीज बेंजने फिरत असतात. काल तर ते चार्टर प्लेनने दिल्लीला गेले. त्या विमानाचे भाडे साडेचार लाख होते. साडेचार लाख एका विमान फेरीसाठी खर्च करणारी माणस जर या देशात खरा कर भरत असतील आणि सारा पैसा जर पांढरा असेल तर देशाच्या अर्थव्यवस्था बरीच सुधारेल यात शंका नाही. साधारणपणे आपल्या देशात उत्पन्न वाढत जाते तसा कर वाढत जातो त्यामुळे अधिक उत्पन्न मिळवणारी माणस कर चुकवतात. यातून काळा पैसा तयार होता. देशातली यच्चयावत श्रीमंत मंडळी कर चुकवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढतात. विविध आश्रमांना किती पैसा मिळतो याचे सगळे हिशोब कागदावर येतात असे नाही. मुख्यत: रोख पैसा झालेला, जमिनींचा व्यवहार किंवा तत्सम व्यवहार हा काळा पैसा तयार करतो. जिथे -जिथे पगार कमी आहे अशा संस्था उदा. पोलीस, सरकारी अधिकारी यांच्या हातात अधिकार मात्र प्रचंड असतात. त्यामुळेच ही मंडळी लाखो - करोडोचे प्रकल्प रोखू शकतात. साहजिकच पैसे देऊन वेगात काम करून घेणा किंवा आपलं काम व्हावं म्हणून पैसे देणं हा अर्थव्यवस्थेतला अपरिहार्य घटक बनला आहे. त्याला 'स्पीड मनी' म्हटल जाते. याचे समर्थन करण्याचा हेतू नाही. पण अपरिहार्य यंत्रणा उभी राहिली आहे हे लक्षात घेण आवश्यक आहे. आणि ती कोणा बाबाच्या उपोषणाने संपणार नाही.

बर हे बाबा कोण तर अण्णा हजारेंच्या आंदोलनातून यांना ही स्फूर्ती मिळाली. खुद्द अण्णांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. अण्णांची पांढरी टोपी या सावळ्या बाबांनी काबीज केल्यावर अण्णांनी मात्र या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. हे म्हणजे सचिन तेंडुलकरने सौरव गांगुलीच्या संघातील स्थान पक्क करण्यासारख आहे. बाबा रामदेव यांनी उपोषण करू नये म्हणून काल चक्क विमानतळावर प्रणव मुखर्जी आणि इतर मंत्री मन वळवायला गेले होते. पूर्वी ही मंडळी इंदिरा गांधी परदेशातून येता-जाता आपले इमान सिद्ध करत. त्यामुळे पत्रकारही विमानतळाला 'इमानतळ' हा शब्द वापरू लागले होते. बरं रामदेव बाबा म्हणजे काय? मुळात ते योगी आहेत. पतंजली योगदर्शनात जिभेची सुरळी करून योगी हवेतील पाणी प्राशन करून जगू शकतो असे म्हणते आहे. तसे असेल तर उपोषणकाळात रामदेव बाबांच्या जिभेवर लक्ष ठेवायला हवे. म्हणजे त्यांना शीळ घालण्यासाठी जिभेची सुरळी करण्याची सोय नाही. बरं योगामध्ये यम-नियम, आसन-प्रत्यार इत्यादी आठ पाय-या सांगितल्या आहेत. म्हणजेच योग शिकणा-यांनी संयमित खावे-प्यावे. सत्य बोलावे, साधन-संपत्तीचा संचय करू नये. कुणाला दुखवू नये इत्यादी अनेक गोष्टी येतात. बाबा मात्र यापैकी केवळ आसनावर भर देतात. त्यांनी केवळ भारतीय समाजाला योग शिकवण्यावर भर दिला असता तर अपरिग्रह (साधन-संपत्तीचा संचय न करणे ) वगैरेमुळे काळा पैसाच काय पण पांढ-या पैसालाही अटकाव बसला असता. पण बाबांनी याएवजी बाबा योग मार्गापासून ढळले आहेत असे आम्हाला नाईलाजाने म्हणावे लागते.

बाबा मैदानात योगासने शिकवतात. आणि त्याला हजारो लोक उपस्थित असतात. हजारो लोकांनी मैदानात योग शिकायला योगासने म्हणजे काय कवायत आहे काय? सदाशिवराव निंबाळकर यांच्या योगविद्या शिबिरापासून ते निकम गुरुजींपर्यंत किंवा सांताक्रूजच्या योग संस्थेपर्यंत जी-जी मंडळी योग शिकवतात. ते-ते पंधरा-वीस ते चाळीस अशा निवडक वर्गाला आसनांचे प्रात्यक्षिक करून असणे शिकवतात. कारण योगासने करताना पाठीचा कणा ताठ राहणे, झटके देत योगासने न करणे, वाकताना किंवा इतर हालचाली करताना या गोष्टींना महत्त्व आहे. यावर योग शिक्षकांनी देखरेख करायची असतात. कारण चुकीच्या पद्धतीने योगासने केल्यास लाभाऐवजी हानी होऊ शकते. मैदानात जमून योगासने केल्यास त्यातून लाभ किती आणि हानी किती याचं हिशेब केलेला बरा!

भारतीय समाजाला आपले नेते नेहमीच संन्यस्त वृत्तीचे लागतात. पण संन्यासी मात्र चालत नाहीत. संन्यस्त वृत्तीच्या माणसांनी राज्य कारभाराला मार्गदर्शन करायचे असते त्यात प्रत्यक्ष भाग घ्यायचा नसतो. सर्वांना चाणाक्याचे उदाहरण माहित आहे. खरे तर देशाचे नेतेही आपल्याला साधू वृत्तीचे लागतात. फ्रान्सचे अध्यक्ष सारकोजी किंवा चर्चिल यांच्यासारखे खाऊन-पिऊन मजेत राहणारे नेते राज्यकारभारही नीट करतात. असे आपल्याकडे घडत नाही असा आपल्या लोकांचा समज आहे. त्यामुळेच वाजपेयी नेहमी स्कॉच- विस्की पितात हे टाईमने छापले असता खूप गदारोळ झाला होता. याचमुळे की काय भगवी वस्त्र घालणा-या आणि पूर्वी लोकांना धर्म आणि मोक्ष यांची शिकवण देणं-यांना अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यात ढवळाढवळ करावीशी वाटू लागली आहे. खर तर या मंडळीना जीडीपी आणि पीपीपी यातील फरक माहित आहे का याची शंका वाटू लागली आहे.

शिल्पा शेट्टीसारखी अभिनेत्री आणि आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघाची मालकीण रामदेव बाबांची शिष्या आहे. शेकडो कोटी खर्चून टीम विकत घेताना तिने रामदेव बाबांना हिशेबाची कागद्पत्र सादर केले होते काय? की रामदेव बाबांच्या शिष्यांना मात्र भ्रष्टाचारातून मोकळीक आहे? आणि उद्या बाबांच्या शिष्यांची खाती स्विस बँकेत निघाली तर बाबा काय करतील? त्यांच्या जागी सामान्य माणूस असता तर म्हणाला असता तसे झाल्यास घर-दार सोडून संन्यास घेईन. पण रामदेव बाबा संन्यासी असल्याने ते काय सोडणार? आणि ज्याला काहीच गमवायचे नाही त्याने कितीही गमजा केल्या तर त्याला कसे अडवणार?? भगवद गीतेत कृष्ण म्हणतो की, युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य मिळवशील- हरलास, जीव गमावलास तर स्वर्गाचे राज्य मिळवशील. तसे आमरण उपोषणातील दोन्ही बाजू आम्हाला 'सेफ'च दिसतात.
- शशिकांत सावंत