Monday, November 5, 2012
किरण नगरकर interview byशशिकांत सावंत
'प्रयोगासाठी प्रयोग करणारा मी नाही!' -किरण नगरकर
-शशिकांत सावंत
कादंबरीचा विषय, भाषाशैली आणि मांडणी या सर्वच बाबतीत प्रयोगशील असलेले जागतिक कीर्तीचे लेखक किरण नगरकर यांची 'दि एक्स्ट्राज' ही त्यांच्याच 'रावण अँड एडी' या आधीच्या कादंबरीचा सीक्वेल असणारी नवी कादंबरी काल प्रकाशित झाली. त्यानिमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...
वॉर्डन रोड या मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत अमेरिकन वकिलातीसमोर एक दोन मज
ली इमारत आहे. गगनचुंबी व्हायचा मोह टाळलेली. तिथे दुसऱ्या मजल्यावरच्या घरात किरण नगरकर राहतात. शिसवी जुन्या पद्धतीचं फनिर्चर, दुमीर्ळ मूतीर् आणि बौद्ध टांका, जुन्या पद्धतीचे सोफे आणि दुसऱ्या मजल्यावर राखलेली हिरवळ... अशा ठिकाणी एक मराठी लेखक राहतो याचं कुणालाही आश्चर्य वाटेल. पण 'हे माझं घर नाही' हे किरण नगरकर आधीच स्पष्ट करतात. पांढरा शुभ्र लेंगा, ग्रे रंगाच्या रेघारेघांचा कुर्ता, वर त्याच्याशी मॅच होणारी दाढी आणि केस, पायात सॉक्स आणि स्लिपर, असं साधारण किरण नगरकरांचं दर्शनीय रूप. चेहऱ्यावर रेषांचं जाळं आणि बोलताना साधारणपणे काही वेळा तुटक होणारी वाक्यं आणि आठवून बोलण्याची आणि विसरण्याची सवय.
किरण नगरकर यांची पहिली कादंबरी १९६७-६८च्या सुमारास 'अभिरुची'मध्ये प्रसिद्ध झाली. तीच 'मौज प्रकाशन'ने 'सात सक्कं त्रेचाळीस' नावाने प्रसिद्ध केली. आशयघन, वेगळं गद्य आणि मुलखावेगळी पात्रं यामुळे तिच्याकडे लक्ष वेधलं गेलं. त्यानंतरची 'रावण आणि एडी' इंग्रजी-मराठी दोन्ही भाषांत प्रसिद्ध झाली. 'गॉड्स लिटल सोल्जर' ही केवळ इंग्रजीत आलेली कादंबरी. 'ककोल्ड' ही इंग्रजीत गाजल्यावर मराठीत 'प्रतिस्पधीर्' म्हणून आली. सई परांजपे यांनी 'रावण आणि एडी'चं बेहद्द कौतुक 'एशियन एज'मध्ये लेख लिहून केलं आणि चाळीचं चित्र रेखाटण्याबद्दलचा आपल्याला मिळालेला किताब नगरकरांना देऊ केला. 'गॉड्स लिटल सोल्जर'चं वाचन आमिर खानने केलं. एकूणच मोजक्याच कादंबऱ्या लिहूनही स्वत:चा वाचकवर्ग तयार करणारे आणि लोकप्रिय असणारे असे किरण नगरकर. त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा...
तुमच्या सर्व पात्रांपैकी रावण आणि एडी तुम्हाला जवळची असावीत, बराच काळ ती तुमच्या डोक्यात असावीत असं वाटतं. स्क्रिप्ट म्हणून तुम्ही त्याला सुरुवात केली आणि मग कादंबरीपर्यंतचा प्रवास कसा झाला?
वाचकांनी काहीही इंटरप्रिट करायला माझी हरकत नसते. तुम्ही म्हणता तसं असेलही, पण मी लिहिताना माझ्या डोळ्यापुढे काहीच आराखडा नसतो. फक्त मला काहीतरी एक गोष्ट माहीत असते. उदा. 'रावण आणि एडी'मध्ये मला एकच माहीत होतं की, हा चौथ्या मजल्यावरून पडलेला मुलगा वाचतो. मग आई त्याचं नाव रावण ठेवते. तसंच 'प्रतिस्पधीर्' मध्ये मला एकच माहीत होतं की, मीरेचा नवरा एक दिवस आपल्या सगळ्या अंगाला निळ्या रंगाने माखून घेईल. पण पूर्ण कादंबरी कशी जाईल हे काही मला माहीत नसतं.
' सात सक्कं त्रेचाळीस' आली तेव्हा ती खूप वेगळी मानली गेली. मराठीच्या महत्त्वाच्या कादंबऱ्यांत तिची गणना होती, तुम्ही मात्र मराठी वाचकांबाबत तक्रारीचा सूर लावला आहे...
एक म्हणजे मी वेगळेपणासाठी काहीही केलेलं नाही. नवीन काही करायचं म्हणून मी करत नाही, कारण हे सारं रामायण, महाभारत, ओडिसी, इलियड यांनी करून ठेवलं आहे, असं माझं मत आहे. प्रयोगासाठी प्रयोग करणारा मी माणूस नाही. 'सात सक्कं त्रेचाळीस' रा. भा. पाटणकरांना खूप आवडलेली आणि श्री.पुं.नी त्यांच्याकडे मागितली. १९७३ साली आम्ही सगळे बसलो आणि श्री.पुं.नी ती फारसे बदल न करता छापली. जे काही थोडे बदल त्यांनी सुचविले त्यामुळे ती अधिकच चांगली झाली. एक संपादक लेखकासाठी काय असू शकतो, याचा मी अनुभव घेतला. त्यातली भाषा वाचकांना वेगळी वाटली, कारण माझा मराठीशी संबंध तुटून बरीच वर्षं झाली होती. कॉलेजात असताना मी काही कथा लिहिल्या होत्या. र्फग्युसनमध्ये एम.ए. करतानाच्या आसपास हे सारं लिहिलं.
' सात सक्कं'चं मुखपृष्ठ अरूण कोलटकरने केलं होतं, त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली. भेंडेंनी फोटोग्राफी केली आणि नंतर लक्षात आलं ते मुखपृष्ठ परवडणारं नाही. का कसं ठाऊक पण, अरूण माझ्यावर चिडला नाही. दुसऱ्या मुखपृष्ठावर जे कोट्स् वापरले त्याच्यावर खूप टीका झाली. आता इतक्या इंग्रजी पुस्तकात कोट्स (ब्लर्ब) वापरले जातात, पण तेव्हा मात्र त्याच्यावर टीका झाली. 'नगरकर काय समजतात स्वत:ला' वगैरे. मराठीत तिची नीट अशी समीक्षा कोणीच केली नाही. माझं वाचलेली मराठी माणसं मला फारशी भेटत नाहीत.
तुम्ही जाहिरात क्षेत्रात काम केलंत या क्षेत्रातील दृश्यात्मकता, प्रिसिजन, चटपटीतपणा, माकेर्टिंग अशा गोष्टींचा तुमच्यावर परिणाम झाला का?
अर्थात! जे काम आपण पंचवीस-तीस वर्षं करतो, त्याचा परिणाम आपल्यावर होतोच. विशेषत: सिनेमा या माध्यमाचा माझ्यावर खूप परिणाम झाला. १९९४ साली मी 'अॅम्ब्रोज पेरोज' हा ब्राझिलियन चित्रपट पाहिला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, आपण 'सात सक्कं त्रेचाळीस'मध्ये वेगवेगळ्या कहाण्या घेऊन जे करत होतो, ते हे होतं. 'रावण आणि एडी' स्क्रिप्ट म्हणूनच आधी तयार झाली. मी खूप सिनेमे बघत असतो. लुई फडिर्नांड सेलिन, ग्रॅहम ग्रीनसारख्या लेखकांचं साहित्य. तसे आवडते लेखक अनेक आहेत, पण त्यांचा कसा परिणाम होतो सांगणं कठीण आहे. उदा : 'मिडनाइट काऊबॉय' ही कादंबरी वाचली. पुढे त्याच्यावर सिनेमा झाला. त्यात गाव सोडून आलेल्या जॉन वोइटला डस्टिन हॉफमन पूर्ण लुबाडतो, पण तरीही त्याला हॉफमनला पाहिल्यावर आनंदच होतो. त्याने लुबाडल्याची भावना राहत नाही. कारण तो एकटा असतो, आणि एकटेपणा काय करू शकतो हे या कादंबरीत दाखविलं आहे.
तुमच्या येऊ घातलेल्या 'दि एक्स्ट्राज'मध्ये रावण आणि एडी मोठे होतात?
एक तर 'एक्स्ट्राज' म्हणजे अशी माणसं ज्यांना कोणी किंमतच देत नाही. दे आर नोबडी. रावण मोठा होतो आणि टॅक्सी चालवायला लागतो. कारण त्याच्यापुढे दुसरा काही पर्यायच नसतो. एडी मोठा होतो आणि पूवीर्च्या काळी आँटी नावाची संस्था होती, हातभट्टीचा गुत्ता चालविणारी...अशा एका आँटीकडे काम करायला लागतो. रावण हा कुठेकुठे वाचलेल्या बातम्यांमधून समोर आला. आजही आपण वाचतो की, चौथ्या मजल्यावरून मूल पडलं आणि जिवंत राहिलं, तशा घटनेतून तो डोळ्यासमोर आला. नंतर मात्र अॅरिस्टॉटल म्हणतो तसं, आपण काम करायला लागतो. म्हणजेच 'आर्ट इज डिस्क्रीप्शन ऑफ दी प्रोबॅबल' कला म्हणजे केवळ शक्यतेचं चित्रण नव्हे, तर संभाव्यतेचं चित्रण आहे. आजकाल बरेच लेखक भरपूर संशोधन करतात. आणि मग लिहून काढतात. अर्थात 'ककोल्ड'साठी मीही संशोधन केलेलं आहे, पण केवळ असं संशोधन हा साहित्याचा आत्मा ठरू शकत नाही. मला नेहमीच प्लॉट महत्त्वाचा वाटतो. कथा महत्त्वाची वाटते. मी प्लॉटच्या अंगाने जाणारा लेखक आहे.
तुम्ही ज्या जगात वावरता ते जग वेगळं आहे आणि तुम्ही ज्या जगाचं चित्रण करता, त्या चाळी, रस्त्यावरची माणसं हे जग वेगळं आहे. तुम्ही या दोन्ही जगाची सांगड कशी घालाल?
लिहिण्यासाठी कल्पना ही महत्त्वाची असते, त्यामुळे मी जे लेखन करतो ते त्या पद्धतीचं आहे. दुसरं म्हणजे माणूस आणि चिंपाझी हे दोन प्राणी पायावर उभे राहतात. त्यांना सतत संतुलन राखण्याची गरज असते. पुढच्या मिनिटाचं माहीत नाही, पण या मिनिटापर्यंत तरी जगण्यात मी हे संतुलन राखलं आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
मुलाखतीबद्दल आभार. एक किरकोळ दुरुस्ती - नगरकरांना अभिप्रेत चित्रपट हा 1994चा ब्राझिलियन नसून 2000 सालचा मेक्सिकन 'आमोरेस पेरोस' हा आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Amores_perros
Post a Comment