Saturday, January 14, 2012

सेल्फ हेल्प पुस्तकांचं जग

सेल्फ हेल्प पुस्तकांचं जग
,
प्रिंट करा सेव करा

ई-मेल करा


प्रतिक्रिया नोंदवा
- शशिकांत सावंत

डेल कानेर्जी ते पाउलो कोएलो पर्यंत अनेकानेक लेखकांनी सेल्फहेल्प कॅटॅगिरीतली पुस्तकं लिहून जगभरच्या वाचकांवर मोहिनी घातली आहे. सतत बेस्ट सेलरच्या यादीत स्थान पटकावणा-या या पुस्तकांचं अंतरंग आणि त्यांच्या यशाचं इंगित जाणून घेण्याचा हा प्रयत्न...
...............

अलिकडे प्रसिद्ध झालेल्या पाउलो कोएलो यांच्या 'अल्केमिस्ट' या कादंबरीने खपाचा उच्चांक गाठला. आजवर अशी अनेक पुस्तकं भरपूर खपतच असतात; पण हे पुस्तक म्हणजे 'सेल्फ हेल्प' प्रकारातली कादंबरी आहे. 'सेल्फ हेल्प' हा इंग्रजीतल्या पुस्तकांचा जॉन्र आहे. संभाषणकलेपासून आत्मिक विकासापर्यंत आणि आनंदी कसं राहावं इथपासून व्यवस्थापनापर्यंत विविध विषयांवर 'सेल्फ हेल्प' प्रकारातली पुस्तकं येतात. यातली पुस्तकं केवळ माहिती सांगणारीच असतात, असं नव्हे. स्वयंपाक कसा करावा, वाहन दुरुस्ती कशी करावी, एकट्या मुलीने कसं जगावं याबद्दलची प्रॅक्टिकल माहिती अनेकदा ही पुस्तकं देतात. या प्रकारातल्या पुस्तकांचीही नावं पाहा : 'हाऊ टू विन फ्रेण्ड्स अॅण्ड इन्फ्ल्युएन्स पीपल', 'थिंक कॅन ग्रो रिच', 'हाऊ टू निगोशिएट'. याच प्रकारातल्या एका पुस्तकाचं नाव चक्क 'हाऊ टू गेट प्रेग्नंट' असं आहे! डेल कानेर्जी, नेपोलियन हिल, विन्सेण्ट नॉर्मन पीले हे तसे जुन्या पिढीतले 'सेल्फ हेल्प' लेखक; पण अलिकडे 'माँक हू सोल्ड हिज फेरारी'चे लेखक रॉबिन शर्मा, 'सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली सक्सेसफुल पीपल'- स्टीव्हन कोवी, पाउलो कोएलो हे सध्याच्या पिढीतले 'सेल्फ हेल्प' लेखक आहे. 'सेल्फ हेल्प' पुस्तकांची मोहिनी कोट्यवधी लोकांवर आहे. यातल्या अनेक पुस्तकांचा खप ५० लाख ते एक कोटी इतका आहे.

पाउलो कोएलो आणि रिचर्ड बाख या लेखकांनी 'सेल्फ हेल्प' प्रकारातल्या पुस्तकांचं कादंबरीकरण (फिक्श्नलायझेशन) केलं. रिचर्ड बाख यांचं 'जोनाथन लिविंग्स्टन सीगल' हे पुस्तक जेव्हा प्रसिद्ध झालं तेव्हा तिचा प्रकार लघुकादंबरीसारखा होता. पण 'नॉन-फिक्शन' म्हणून असाहित्यिक पुस्तकांमध्ये ते टाकलं गेलं होतं. किमान प्रकाशकांनी तरी तसा उल्लेख केला होता.

पाउलो कोएलोचं 'अल्केमिस्ट' हे पुस्तक १९८७ मध्ये प्रसिद्ध झालं. हा ब्राझिलियन लेखक तेव्हा ४० वर्षांचा होता. आज त्याच्या सर्व पुस्तकांचा मिळून खप सहा कोटी इतका आहे. त्यात 'अल्केमिस्ट' आघाडीवर आहे. २००३ मध्ये 'अल्केमिस्ट' हे जगात खपलेल्या सर्वाधिक पुस्तकांमध्ये सहाव्या क्रमांकावर होतं. या पुस्तकाचा गाभा सांगायचा झाला, तर एका वाक्यात सांगता येईल, 'स्वत: पाहिलेल्या स्वप्नाचा शोध घेणं'. यातल्या सान्तियागो या मुलाला एक स्वप्न पडतं. इजिप्तच्या पिरॅमिडपाशी एक मुलगा त्याला दिसतो आणि सांगतो की, 'इथे आलास तर तुला खजिना मिळेल.' त्यानंतर मुलगा या शोधाला निघतो. एक म्हातारा गृहस्थ त्याला मार्गदर्शन करतो. त्याचं नाव असतं माल्की जेदेक. तो मुलाला म्हणतो, 'मी सालेमचा राजा आहे.' त्यावर मुलगा विचारतो, 'एक राजा गुराख्याच्या मुलाशी का बोलतो?' तेव्हा तो सांगतो, 'त्याला अनेक कारणं आहेत. महत्त्वाचं म्हणजे तू तुझ्या भविष्यातलं स्थान शोधण्यास यशस्वी झाला आहेस.' त्यानंतर मुलगा मेंढरांना विकून प्रवासाला निघतो. या प्रवासात त्याला कित्येक माणसं भेटतात. ती त्याला काहीतरी देऊन जातात. कधी एखादा उपदेश, तर कधी जगण्यातलं सौंदर्य दाखवतात. कधी त्यांच्याबरोबर तो एखादा अनुभव घेतो. उदा. तो वाटेत एका दुकानात काम करतो. त्या दुकानदाराला म्हणतो, 'मला इजिप्तला जायचं आहे.' तेव्हा दुकानदार म्हणतो, 'मी मक्केला जायचं स्वप्न पाहतो, पण जात नाही; कारण त्या स्वप्नावरच मी जिवंत आहे.' मुलगा तिथे पैसे कमावून इजिप्तला जायला निघतो आणि तो व्यापारीही मक्केला जायला निघतो.

प्रवासात तुला सतत सूचक चिन्हं दिसतील, असं मुलाला सांगण्यात आलेलं असतं. वाटेत त्याला एक इंग्रज माणूस भेटतो, ज्याने 'अल्केमिस्ट'ची कहाणी ऐकलेली आहे. 'अल्केमिस्ट' म्हणजे जो स्वत:च्या आत्म्यापर्यंत पोहचू शकतो, असा माणूस. हे ज्ञान मुलाला प्रवासात होतं. मुलगा आणि इंग्रज पुढे जात राहतात. पुढे ते युद्ध अनुभवतात. खरोखरचा 'अल्केमिस्ट' त्याला भेटतोही. फातिमा नावाची तरुणी त्याला भेटते, तिच्या तो प्रेमात पडतो. पण पिरॅमिडच्या दिशेने त्याचा प्रवास चालूच राहतो. नंतर प्रचंड वादळ येतं. मुलाला वाळवंट आणि वारा अशा गोष्टींशी संवाद केल्याचा आगळा अनुभव येतो. तो पिरॅमिडपाशी पोहोचतो. खजिन्याच्या आशेने खणू लागतो, पण खजिना सापडत नाही. त्याला सैनिक पकडतात. आपण खजिन्यासाठी खणतोय असं सांगितल्यावर एक सैनिक म्हणतो, 'मलाही स्पेनच्या एका पडक्या चर्चपाशी खजिना असल्याचं स्वप्न पडत असे. पण मी त्यावर विश्वास ठेवला नाही.' मुलाला कळतं स्पेनमध्ये आपण होतो तिथेच खजिना असणार. मुलगा स्पेनला परततो. खजिन्यासाठी खणू लागतो. ते खणताना त्याला वारा सांगतो, 'हे रहस्य तुला आधीचं सांगितलं असतं तर तुला पिरॅमिड पाहता आला नसता.'

ही कहाणी एक फेबल (रूपककथा) आहे. अशा कहाण्यांमध्ये जीवनविषयक तत्त्वज्ञान, तात्पर्यं ठासून भरलेली असतात. 'अल्केमिस्ट'मध्ये वाचायला आवडतील अशी अनेक वाक्यं आहेत. 'जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मिळायची असते, तेव्हा ती मिळवण्यासाठी अख्खं विश्व काम करतं,' हे वाक्य घ्या. 'ओम शांती ओम'सारख्या 'आजच्या' चित्रपटात हे वाक्य तीन-चार वेळा येतं. 'अल्केमिस्ट'ला मुलगा विचारतो, 'अनेकजण परिस शोधत होते. पण तो तुलाच कसा सापडला?' त्यावर 'अल्केमिस्ट' सांगतो, 'इतरजण केवळ धनपरिस शोधत होते. त्यांना नशिबात असलेली गोष्ट केवळ शोधायची होती, त्याप्रमाणे जगायचं नव्हतं', 'ज्याच्या हृदयात आनंद असतो, तोच खरा आनंदी असतो', 'खरं सुख प्रवासात, धडपडीत असतं', 'आपण जसे विचार करतो तसे आपण बनतो'- असे अनेक छोटेमोठे धडे पानोपानी 'अल्केमिस्ट'मध्ये सान्तियागोला मिळत जातात. आजवरची बहुतांश सेल्फ हेल्प पुस्तकं हेच सांगतात. त्यांच्या शिकवणीचा गाभा असा सांगता येईल की,

१) तुम्हाला जे काही मिळवायचं असेल त्याचा तुम्ही सतत ध्यास घ्यायला हवा.

२) तुमची इच्छा तीव्र असेल तर तुम्हाला मदत करणारी माणसं मिळतील. गोष्टी आपोआप घडून येतील. यातली काही पुस्तकं असंही सांगतात की, पैसा आणि मटेरियल मिळवण्यातच सुख आहे असं नाही. हे सगळं करताना जगण्याचा अनुभव नीटपणे घेणं यातही आनंद आहेच.

खूप वर्षांपूवीर् प्रसिद्ध झालेल्या नेपोलियन हिलचं 'थिंक अँड ग्रो रिच'सारखं पुस्तक पैशासारखी गोष्ट मिळवायला ध्यास घ्यायला हवा, असं सांगतंच, पण त्याचबरोबर 'फोर्ड'सारख्या मोटार कारखानदारांची उदाहरणं देतं. हेन्री फोर्ड हा स्वत: कामगारांबरोबर वर्कशॉपमध्ये काम करायचा आणि त्याला शेकडो कामगारांची नावं माहीत होती. यासारख्या साध्या गोष्टींचा कामगारांवर परिणाम होतो आणि ते तुम्हाला मदत करतात. डेल कानेर्जीसारखे लेखक सांगतात की, 'दुसऱ्यांच्या गुणांचं अॅप्रिसिएशन, चांगलं वागणं हीदेखील यशाची एक गुरुकिल्ली आहे.' त्यात वस्तूंचं उत्पादन, विक्री, इतरांकडून काम करून घेणं, संवादकौशल्याच्या आधारावर वस्तू विकणं या गोष्टींना महत्त्व प्राप्त झालं. यातूनच व्यवस्थापन, जाहिरात, विक्रीकला यांचं शास्त्र विकसित होत गेलं. दैनंदिन जीवनात काम करून पैसा कमावणाऱ्या पती-पत्नी किंवा एकट्याच नवऱ्याच्या अशा काही आकांक्षा तयार झाल्या त्या पूर्ण करण्यासाठी ब्ल्यू कॉलर जॉब, सेल्समन, विक्री प्रतिनिधी असे रोजगार लाखोंच्या संख्येने तयार झाले. माल विकण्याबरोबरच स्पधेर्ला तोंड देणं, अनेक तास काम करणं त्यातूनही उत्साह टिकवणं या गोष्टी महत्त्वाच्या बनल्या आहेत. आधुनिक पाश्चात्य जगात, विशेषत: अमेरिकेत, याबाबतचं मार्गदर्शन करण्याचा आणि घेण्याचा पुस्तकं हा एक मार्ग होता.

डेल कानेर्जीसारख्यांनी संभाषणकलेबाबतचं पुस्तक लिहितानाच त्याची वर्कशॉप्सही सुरू केली. स्पष्ट उच्चार करणं, बोलण्याचा सराव करणं, आपलं बोलणं पटवण्यासाठी आकडेवारी विशिष्ट पद्धतीने मांडणं यासारख्या कितीतरी प्रॅक्टिकल हिण्ट्स डेल कानेर्जीच्या पुस्तकात आढळतात. उदा. एका कारखान्यात वर्षाकाठी काही हजार चपलांचे जोड तयार होतात. हीच आकडेवारी अशी मांडली की, आमच्याकडे तयार होणारे जोड एकाशेजारी एक ठेवले तर मुंबई ते दिल्ली इतकं अंतर भरेल, तर त्या आकडेवारीचा जोरकसपणा कळतो.

' हाऊ टू स्टॉप वरिंग स्टार्ट लिव्हिंग' नावाचं पुस्तक डेल कानेर्जीने लिहिलं. त्यात त्याने म्हटलं होतं की, तुम्हाला ज्या समस्या भेडसावतात, त्या कागदावर लिहिल्यावर तितक्याशा कठीण वाटत नाहीत, हे त्यांना सांगायचं होतं. डेल कानेर्जीच्या दोन्ही पुस्तकांत छोट्या- छोट्या गोष्टींमधून विकास करून घेतलेल्या व्यक्तींची उदाहरणं मोठ्या प्रमाणावर होती आणि या पुस्तकांची भाषा विलक्षण प्रवाही असे.

१९७०-८० च्या दशकात डॉ. वेन डायर यांची 'पुलिंग युवर ओन स्ट्रिंग्ज', 'युवर एरोनॅस झोन' अशी पुस्तकं प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर 'स्काय इज द लिमिट' हे त्यांचं पुस्तक आलं. आधीच्या दोन पुस्तकांत मानवी त्रुटी व वैगुण्य कशी दूर करावी याची चर्चा होती. उदा. 'पुलिंग युवर ओन स्ट्रिंग्ज'मध्ये आपण काम पुढे ढकलत राहतो, त्यावर एक प्रकरण आहे. त्यावर काय करता येईल याबाबत लेखक म्हणतो, 'जे काम तुम्हाला आवडत नाही ते पाचच मिनिटं करायचं आणि मग बंद करायचं असं ठरवा.' कारण अनेकदा एकदा काम सुरू केलं की, आपण ते सोडत नाही. पण सुरुवात करण्यातच अडचण येते.

' आय अॅम ओके, यू आर ओके' हे पुस्तक वैज्ञानिक पद्धतीने माणसाच्या व्यक्तिविकासाबद्दल सांगतं. एरिक बनेर् या मानसशास्त्रज्ञाने आणि 'आय अॅम ओके यू आर ओके' या पुस्तकाचा लेखक थॉमस हॅरिसने 'बोलणं' चार गटांत विभागलं आहे.

१) आय अॅम ओके, यू आर नॉट ओके.
( मी ठीक आहे; पण तू ठीक नाहीस).

२) आय अॅम नॉट ओके, यू आर ओके
( मी ठीक नाही, पण तू ठीक आहेस).

३) आय अॅम ओके, यू आर ओके

४) आय अॅम नॉट ओके यू आर नॉटू ओके.

या वाक्याचा अर्थ समजून घेण्याअगोदर 'ट्रॅन्सॅक्शन अॅनालिसिस' नावाची जी मानसशास्त्रीय कक्षा आहे तिचा अर्थ समजून घेऊ. मानवी मन हे तीन प्रकारच्या अवस्थांमध्ये असतं. पहिली अवस्था म्हणजे 'मूल', दुसरी अवस्था म्हणजे 'पालक' आणि तिसरी अवस्था म्हणजे 'प्रौढ.' एखादी घटना जेव्हा घडते तेव्हा आपण तिला प्रतिसाद देताना वरीलपैकी तीन अवस्थांमध्ये असतो. उदा. आपण कुठेतरी जात असताना बस मध्येच बंद पडली तर,

१) आपण खूप चिडू, दुर्मुखले होऊ. ही अवस्था मुलासारखी आहे.

२) आपण नीट विचार करून निर्णय घेऊ. म्हणजे असं की, बस पंक्चर झाल्यास दुसऱ्या बसमध्ये चढता येतं. पाच मिनिटं थांबल्यास दुसरी बस येईल. असा विचार आपण घाई नसल्यावर करू आणि घाई असेल तर टॅक्सीने जाऊ.

३) पालक या शीर्षकाखाली येणारा प्रतिसाद हा आईवडील काय सांगतात किंवा संस्कारांनी आपल्याला काय शिकवलं आहे, त्यानुसार येतो. म्हणजे टॅक्सीने जाणं ही चैन अशी जर आईवडिलांची कल्पना असेल, तर आपल्यावरही तो संस्कार येतो आणि मग पुढच्या बसला कितीही उशीर झाला तरीही आपण टॅक्सी करत नाही.

' आय अॅम ओके, यू आर ओके' या वाक्याचा अर्थ असा होतो की, संभषण करताना आपण जेव्हा मूल असतो, तेव्हा समोरच्यानेही तसंच असलं पाहिजे. आपण जेव्हा प्रौढ असतो म्हणजे आपल्यातला प्रौढ जेव्हा प्रतिसाद देतो तेव्हा समोरच्यानेही तसंच बोलणं अपेक्षित असतं. मग ते संभाषण नीट होतं. याचं एक उदाहरण पाहू - तुम्ही आणि मित्र सिनेमाहून आला आहात. मित्र विचारतो, 'सिनेमा कसा झाला?' तुम्ही म्हणता, 'असले सिनेमे मीही बनवेन.' यावर तुमचा मित्र म्हणतो, 'असा सिनेमा बनवल्यास मलाही त्यात रोल द्यायला विसरू नकोस.' आता इथे या संभाषणात तुमच्यातल्या मुलाने बालिश कॉमेंट केली, त्याला मित्रानेही तसाच प्रतिसाद दिला, पण त्याऐवजी जर मित्र म्हणाला, 'सिनेमा बनवणं इतकं सोपं आहे का? तुला सगळ्याच गोष्टी सोप्या वाटतात.' वगैरे वगैरे, तर ते संभाषण बालक व पालकाचं होतं. अर्थातच ते नीट होत नाही. त्यामुळेच दैनंदिन व्यवहारात आपण मूडने प्रतिसाद दिल्यास संभाषण बिकट होतं.

थोडक्यात, बालक-बालक, पालक-पालक, प्रौढ-प्रौढ ही संभाषणं नेहमी निकोपणे होतात. उलट बालक-प्रौढ, बालक-पालक, पालक-प्रौढ ही नेहमीच 'आय अॅम ओके यू आर नॉट ओके' या सदरात मोडतात.

आणखी एका वेगळ्या पुस्तकाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. ते पुस्तक म्हणजे 'झेन अॅण्ड मोटारसायकल मेण्टेनन्स'. हे पुस्तक दर्जाबद्दल बोलतं. यातल्या नायकाने विविध गोष्टी केल्या आहेत; पण त्यात तो असमाधानी आहे. भारतातल्या 'बनारस हिंदू विद्यापीठा'तही तो शिकून आला. माया म्हणजे काय? असं शिक्षकांना विचारल्यावर त्यांनी त्याला मायेबद्दल सांगितलं. मग 'अणुबॉम्बचा स्फोट होऊन माणसं मरणं हीदेखील मायाच आहे का, असा प्रश्न त्याने शिक्षकांना विचारला. ते म्हणाले, 'हो.' यानंतर त्याने विद्यापीठ सोडलं. एक मोटारसायकल घेऊन तो डोंगरदऱ्यातून फिरतो, माणसांना भेटतो. 'क्वालिटी' अर्थात दर्जा म्हणजे काय, याचा तो शोध घेतोय. असं करता करता एक दिवस त्याला ज्ञानप्राप्ती होते. थोडासा बुद्धाच्या शोधासारखाच हा शोध आहे. म्हटलं तर प्रवासवर्णन, म्हटलं तर आत्मचरित्र, म्हटली तर कादंबरी असं वाटणाऱ्या या पुस्तकाने वाचकांना वेड लावलं. 'हिप्पी चळवळीचा' उगम होण्यामागे या पुस्तकाचा मोठा हात होता. जगभर घरदार सोडून निसर्गाच्या सहवासात मिळेल तसं राहायचं अशी प्रेरणा या पुस्तकाने दिली.

याच कालावधीत ह्युज प्राथरचं 'नोट्स टू मायसेल्फ' हे पुस्तक प्रसिद्ध झालं. या पुस्तकात रोजच्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींचं विश्लेषण आहे, ते वाचताना अनेकदा आपल्याला आपल्याच मनाचा ठाव घेता येतो. उदा. लेखक म्हणतो की, काल मला एक विशिष्ट वेदना जाणवत होती. हळूहळू मी तिचं निरीक्षण केलं आणि मला समजलं की, तिचा संबंध माझ्या मनातल्या अस्वस्थतेशी आहे. वेगवेगळ्या प्रसंगात आपण असं का वागतो? आपलं मन विशिष्ट पद्धतीने का विचार करतं? या पद्धतीचं निरीक्षण ह्यू प्राथरने बहुतांशी स्वत:च्या मनाला केंदस्थानी ठेवून केलं आहे. त्यामुळे तो असं करा, तसं करा न सांगता स्वत:च्या मनाबद्दल बोलत राहतो. उलट स्वेट माडेर्नसारख्या लेखकाची 'सेल्फ हेल्प'वरची पुस्तकं वाचकाला सतत वेगवेगळ्या सूचना करत राहतात. ही पुस्तकं बरीचशी उपदेशाकडे झुकतात. 'हाऊ टू स्टडी'सारखी पुस्तकं अभ्यास कसा करावा याचं तंत्र सांगताना स्मरणशक्ती, झोप, अभ्यासाचं तंत्र अशा विविध गोष्टींची माहिती देतात. असं पुस्तक वाचताना कुणाची तरी उपदेशबाजी वाचतोय असं वाटत नाही. विविध ग्राफ, आराखडे, आकडे यातूनही हे पुस्तक विषय मांडतं. 'सेल्फ हेल्प'मधल्या अनेक पुस्तकांचं वर्णन 'प्रॅक्टिकल मॅन्युअल' म्हणूनही केलं जातं. 'व्हॉट कलर इज युअर पॅराशूट' या पुस्तकाच्या शीर्षकाखाली लिहिलं आहे, 'अ प्रॅक्टिकल मॅन्युअल फॉर जॉब हंटर्स'. नोकरी शोधताना काय करावं, हे या पुस्तकात आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला आवडणारं काम कसं शोधावं, स्मरणशक्ती, आपल्याला कोणाबरोबर काम करायला आवडेल यासारख्या प्रश्नांचे तक्ते जागोजागी आढळतात. १९७० मध्ये हे पुस्तक प्रसिद्ध झालं आणि आजतागायत त्याचा खप कोटीच्या वर गेला असावा.

व्यक्तिगत अनुभवावर आधारित पुस्तकांचा खप कमी असतो. पण ती अधिक परिणामकारक असतात. उदा. 'अप द ऑर्गनायझेशन' हे रॉबर्ट टाऊनसेण्ड याचं पुस्तक. टाऊनसेण्ड हा 'रेण्ट अ कार' या कंपनीचा प्रमुख होता. वेळोवेळी तो आपल्या मित्रांना व्यवसायातल्या अनुभवाचा सल्ला देई. त्याने म्हटलं की, 'मी माझ्या शंभरेक मित्रांसाठी हे पुस्तक लिहिलं आहे. 'एरीज रेण्ट अ कार' ही कंपनी तोट्यात होती. रॉबर्ट टाऊनसेण्डने ती फायद्यात आणून दाखवली आणि नंतर 'अप द ऑर्गनायझेशन' हे पुस्तक लिहिलं आणि ते 'न्यूयॉर्क टाइम्स'च्या बेस्ट सेलरच्या यादीत सात महिने होतं. १९७० मध्ये ते प्रसिद्ध झालेलं असलं, तरीही त्यातला बराचसा भाग आजही उपयोगी आहे. पूर्ण पुस्तक अल्फाबेटिकली रचलेलं आहे. म्हणजे ए-असिस्टण्ट, बी-बॉस, बजेट. सी-चेअरमन या पद्धतीने पुस्तकाची मांडणी केलेली आहे. अनेकदा अख्ख्या पानात केवळ ८-१० ओळीच आढळतात. त्यामुळे कुठलंही पान काढून कधीही वाचता येतं. या प्रकरणात अनुभवावर आधारित छोट्या-मोठ्या गोष्टी त्यांनी दिल्या आहेत. उदा. १३ व्या पानावर 'कॉल युवरसेल्फ' असा १३-१४ ओळींचा मजकूर आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, 'तुम्ही जो व्यवसाय करत असाल त्यातून सुटी घेतल्यावर स्वत:च्याच कंपनीत फोन करा आणि एक ग्राहक म्हणून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो ते बघा. तुम्हाला खूपच खळबळजनक गोष्टी कळतील. जी माणसं वेडीवाकडी उत्तरं देतील त्यांची पदं आणि नावं विचारू नका. शिक्षा करण्यासाठी तुम्ही हा फोन केलेला नाही, तर सुधारणेसाठी केला आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर फोन करून स्वत:चीच अपॉइण्टमेण्ट मागा. मग तुम्हाला काय अनुभव येतो ते बघा.' बजेट, प्रमोशन, शेअर होल्डर्स, कामगर युनियन अशा सर्व विषयांवर त्याने एक-दीड पानात साधेपणाने लिहिलेलं आहे आणि क्षणोक्षणी त्यात प्रॅक्टिकल हिण्ट आहे.

' सेल्फ हेल्प' प्रकारातलं खपाचं उच्चांक गाठणारं आणखी एक पुस्तक म्हणजे 'पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग' हे विन्सेण्ट नॉर्मन पीले यांचं पुस्तक. दैनंदिन जीवनातल्या कंटाळा, नैराश्य, कामातला निरुत्साह, मानसिक अस्वस्थता या सर्वांवर मात करण्यासाठी 'पॉझिटिव्ह थिंकिंग' म्हणजे सतत भावात्मक विचार करणं, हे पीले यांनी या पुस्तकात सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी 'बायबल'मधल्या उताऱ्यांचा आधार घेतला आहे. इफ गॉड बी फॉर अस, हू कॅन बी अगेन्स्ट अस' (देव जर आपल्याबरोबर असेल तर आपल्याविरुद्ध कोण जाणार) किंवा 'जर तुमची श्ाद्धा असेल तर तुम्हाला काहीही अशक्य नाही'. स्वत:बरोबर सतत बाळगणाऱ्या सेल्समनचं त्यांनी उदाहरण दिलं आहे. पीले यांचं काम प्रामुख्याने काऊन्सेलरचं होतं. तेव्हा विविध क्षेत्रातली माणसं त्यांना भेटत. त्यामुळे बायबलच्या आधारे श्ाद्धा आणि विश्वास यातून पीले त्यांना धीर देत. त्यांनी प्रस्तावनेत म्हटलं आहे की, 'या पुस्तकात मी जे सांगतो आहे ते मी कठोर परिश्ामातून शिकलो आणि मला नेहमीच त्या समस्यांतून उपाय सापडला. जिझस ख्रिस्ताच्या शिकवणीतून मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत. 'असं असलं तरीही हे पुस्तक धामिर्क नाही.

' माँक हू सोल्ड हीज फेरारी'मध्ये लेखक एका कायदेविषयक कंपनीत राब राब राबत असतो. त्याच्याकडे पाच आकडी पगार, बंगला, फेरारी सर्व सुखं असतात. पण स्वत:साठी वेळ नसतो. आयुष्य सतत तणावाखाली असतं. एक दिवस हे सगळं सोडून तो भारतातल्या एका खेड्यात जाऊन राहतो आणि तिबेटियन साधूंमध्ये राहून शांत, नैसगिर्क जीवन जगताना त्याला आपण ऐहिक गोष्टींच्या मागे धावून काय गमावलं हे कळतं. हे पुस्तक रॉबिन शर्मा यांनी लिहिलं आहे, तर पाउलो कोएलो यांनी 'अल्केमिस्ट'. हे दोन्ही लेखक पाश्चिमात्य विचारसरणी आणि मटेरिअलिझम नाकारतात.

पहिल्या-दुसऱ्या महायुद्धानंतर पाश्चिमात्य जग हळूहळू सुबत्तेकडे गेलं. पूर्व जर्मनीसारखे अपवाद सोडले तर सर्वत्र उत्तम उत्पादन, विक्रीयंत्रणा यामुळे मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आणि सुस्थितीत राहू लागला. हा वर्गच प्रामुख्याने स्वप्न पाहणारा होता आणि त्याला वरच्या वर्गात जायचे रिसोसेर्स म्हणून मध्यमवर्गाने 'सेल्फ हेल्प' पुस्तकांकडे पाहिलं आणि बऱ्याच अंशी त्यांनी या पुस्तकांचा उपयोग करून घेतला. केवळ मानसिक समाधान करणं आणि प्रेरणा देणं एवढंच काम करणारी ही पुस्तकं नव्हती. विविध भाषा शिकवणं, घरातल्या वस्तू रिपेअर करायला शिकवणारं 'वंडर वर्कर'सारखं पुस्तक, गणित, विज्ञान असे विषय शाळा, कॉलेजात न गलेल्यांना शिकवणारी पुस्तकं, 'कम्प्युटर फॉर डमीज', 'चेस फॉर डमीज' असे विविध विषय ते न येणाऱ्यांना शिकवणारी पुस्तकं असा मोठा पसारा 'सेल्फ हेल्प' पुस्तकांमध्ये आहे.

७०-८० नंतर तिसरं जग म्हटल्या जाणाऱ्या साऊथ अमेरिका, भारत इथेही मोठ्या प्रमाणात मध्यमवर्ग निर्माण झाला. भारतामध्ये आणीबाणी आणि जनता राजवटीनंतर मध्यमवर्गाचं सामाजिक, राजकीय महत्त्व लक्षात आलं आणि त्यातूनच या वर्गाकडे राज्यकतेर् लक्ष देऊ लागले. त्याअगोदर या वर्गातली मुलं मेडिकल, इंजिनियरिंगला जाण्याचं ठरवत. राजीव गांधींच्या राजवटीनंतर भारताने खऱ्या अर्थाने कम्प्युटर स्वीकारला आणि सर्व क्षेत्रात आपण प्रोफेशनल बनलं पाहिजे, असा एक विचार सुरू झाला. नोकरी व्यतिरिक्त इतरही उद्योगांची चाचपणी करू लागला. कधी नाही ते माणसं जास्त पगारासाठी कंपन्या बदलू लागली. ९० च्या दशकात आपण नवीन आथिर्क सुधारणा स्वीकारल्या. त्यानंतर अनेक वर्षं बचत करून ठेवलेला पैसा मध्यमवर्गाने बाजारात आणावा यासाठी बहुराष्ट्रीय मोठ्या कंपन्या विचार करू लागल्या. त्यातून अनेक चॅनेल्स सुरू झाल्याने कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचणंही त्यांना सोपं झालं.

पण या सगळ्यातूनच जुन्या पद्धतीचं शांत, सुस्थिर जीवन आणि नवीन जीवनपद्धती ज्यात मॉल, मल्टिप्लेक्स, विविध पद्धतीच्या गाड्या येतात हे मध्यमवर्गाला खुणावू लागलं. तरुण मुलं-मुली ८-१२ हजार रुपयांसाठी शिक्षण सोडून कॉल सेंटरमध्ये राबू लागली. एक प्रकारे या देशाच्या काही भागाचं अंशत: अमेरिकनायझेशन सुरू झालं आणि अमेरिकेत लोकप्रिय असलेल्या 'सेल्फ हेल्प' पुस्तकांचा आणि संस्थांचा ट्रेंड इथेही सुरू झाला. शिव खेरा ते अरिंदम चौधरींपर्यंत इथले स्थानिक गुरूही तयार झाले. 'सेव्हन हॅबीट्स ऑफ हायली सक्सेसफुल पीपल'सारख्या पुस्तकातले उतारे दडपून ही माणसं आपल्या नावावर देऊ लागली. 'चिकनसूप फॉर द सोल'मधल्या भाबड्या कथांतून त्याला जीवनाचा आशय गवसू लागला. हे बीजं इतरही क्षेत्रात पसरत आहेत. संदीप खरेसारखे खास कॉल सेंटर सेन्सिबिलिटीचे कवीही आता साहित्यात निर्माण झाले आहेत.

ज्या जगात आपण जगत असतो ते आपल्या व्यतिरिक्त शेकडो-हजारो माणसांना आपल्याशी जोडत असतं. त्यातून निर्माण झालेली व्यवस्था जगड्व्याळ असते आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांना सोपी उत्तरंही नसतात. म्हणूनच 'सेल्फ हेल्प'मधली बहुतेक पुस्तकं तिथे कुचकामी ठरू शकतात. पण डॉ. वेने डायर किंवा नॉर्मन विन्सेण्ट पिले यासारखी मंडळी तुमची मनोदशा आनंदी आणि भावात्मक करण्यावर भर देतात. हे काम एकप्रकारे रिलिजीअस आहे. (धामिर्क अर्थाने नव्हे) काही अंशी आपल्याकडच्या धामिर्क गुरूंनीही हे काम केलं. त्यामुळे १९९० नंतर त्यांनाही अमाप लोकप्रियता लाभली.

' सेल्फ हेल्प' पुस्तकांमधला बराचसा भाग उपयोगी असला तरी आपल्या समाजात नोकरी व्यवसाय करताना जो अनुभव येतो त्यामागे भारतीय मनोरचनाही आहे. उदा. आपल्याकडे व्यवसाय करताना पेमेंट उशिरा देणं किंवा चुकवणं याचं प्रमाण मोठं आहे. यावर तुम्ही काय कराल? माझा एक उद्योगपती मित्र सांगतो,'नारायण मूतीर्ंना इतकं यश आणि पैसा मिळवणं शक्य झालं, कारण त्यानी सतत परदेशी कंपन्यांशी व्यवहार केला. तिथे पेमेंट सांगितलेल्या वेळेत मिळतं. त्यांनी भारतीय कंपन्यांशी व्यवहार केला असता तर कठीण असतं. इथे मला सात लाख रुपयांचं पेमेंट मिळवण्यासाठी कोर्टात जावं लागलं आणि अनेक वर्षं त्याचा खटला चालू आहे.'

तरीही 'नोट्स टू मायसेल्फ', 'झेन अॅण्ड आर्ट ऑफ मोटरसायकल मेण्टेनन्स', 'बुक ऑफ क्वेश्चन्स'सारखी पुस्तकं हळूहळू आपल्याला फ्रिट्झो काप्राचं 'टनिर्ंग पॉइण्ट' किंवा अॅलन वॅट्सच्या 'झेन बुद्धिझम'च्या पुस्तकांकडे नेतात. बर्ट्राण्ड रसेलसारख्यालाही 'कॉन्कवेस्ट ऑफ हॅप्पीनेस'सारखं पुस्तक लिहावंसं वाटलं. यावरून सेल्फ हेल्प पुस्तकं वाचण्याइतकीच लिहिण्याची उमीर् किती प्रबळ आहे हे लक्षात येतं. काही वेळा मानसशास्त्र, व्यवस्थापन, गणित, बुद्धिबळ, चित्रकला यासारख्या विषयातल्या आनंददायक गोष्टींचा साठाही ते आपल्याला दाखवतात आणि अगदीच काही नाही तर कधी कधी नुसताच निखळ वाचनाचा आनंद आपल्याला देतात.

जी पुस्तकं सिनेमाच्या विशिष्ट आकृतीबंधांना स्पर्श करतात ती यशस्वी ठरतात. उदा. 'सुपरमॅन' मालिका, 'द गॉडफादर'सारखी कादंबरी, 'रामायण', 'महाभारत', 'ओडिसी'सारखी महाकाव्यं यामध्ये काही विशिष्ट आकृतीबंध आढळतात. याचं कारण हजारो वर्षांच्या माणसाच्या मेंदूच्या उत्क्रांतीत आगीचं भय, मोठ्यांबद्दल आदर, अपमानाबद्दल चीड अशा गोष्टी साठवल्या गेल्या आणि साहित्यात त्यांना शब्दरूप मिळालं. गेल्या १०० वर्षांतले माणसांचे ऐहिक शोध हादेखील त्याच्या मेंदूतल्या आकृतीबंधाचा भाग झाला नसेल ना आणि त्यातूनच पाउलो कोएलोसारख्याच्या 'अल्केमिस्ट'मधून या भागाला स्पर्श होत असावा. त्यामुळे कोट्यवधी वाचकांचं ते आवडतं पुस्तक ठरलं.

थोडक्यात पाश्चिमात्य लेखकांच्या लेखनापासून सुरू झालेला 'सेल्फ हेल्प' पुस्तकांचा ट्रेंड आता आशियाई आणि पौर्वात्य पद्धतीच्या लेखनाकडे झुकतो आहे. अलीकडचे गाजलेलं नाव म्हणजे दीपक चोप्रा. त्यांची 'क्वांटम हिलिंग' आणि इतर पुस्तकं 'होलिस्टिक लिव्हिंग'वर भर देतात. योग, आयुवेर्द, शाकाहार, निसर्गाशी ट्युण्ड अशा राहणीतून निरोगी राहणं आणि मन प्रसन्न ठेवणं वगैरे विचार त्यात असले तरी फ्रिज्दॉक काप्रापासून पीलेपर्यंत हॉलिवुडचे अभिनेते आणि सेलिब्रिटिज यांच्या शिष्योत्तमांमध्ये असल्याने त्यांना आणि पुस्तकांना मोठा वाचकवर्ग लाभला. राहणीमानाबरोबरच अध्यात्मिकतेलाही त्यांची पुस्तकं महत्त्व देतात. त्यामुळे ध्यानधारणेचाही आग्रह आढळतो.

त्यामुळेच पुस्तकांच्या कुठल्याही दुकानात आज खपातल्या पुस्तकांचं मोठं दालन 'सेल्फ हेल्प' प्रकारातल्या पुस्तकांनी व्यापलेलं आढळतं आणि एकाच वेळी त्यात सर्व पिढ्यातले लेखक आढळतात. नेपोलियन हिल, डेल कानेर्जी ते स्टिफन कोवी, दीपक चोप्रा, रॉबिन शर्मा हे सारे एकाच वेळी लोकप्रिय असल्याचे दिसतात. त्यातला आपला 'यशाचा ब्रँड' कुठला, हे वाचकांनी चाळून ठरवायचं असतं.

No comments: