Thursday, December 20, 2012

मराठी साहित्याची धाव...कुंपणापर्यंत! शशिकांत सावंत | गेल्या वीस वर्षांत जागतिक स्तरावर झळकलेल्या लेखकांमध्ये जपानच्या हारिको मुराकामी आणि तुर्कस्तानच्या ओरहान पामुक यांचा समावेश होतो. या दोन्ही लेखकांनी अनेक दर्जेदार पुस्तके लिहिली. त्यातही ओरहान पामुकला नोबेल पुरस्कार मिळाल्याने तो प्राधान्याने वाचला जाऊ लागला. हारिको मुराकामीने गूढता, अतिवास्तववाद, नावीन्य यांचे मिश्रण करत ‘काफ्का आॅन द शोअर’सारखी कादंबरी किंवा एलिफन्ट व्हॅनिशेस, स्लिपिंग विमेन, ब्लाइंड विलोज यासारखे कथासंग्रह दिले. त्यानंतर फ्रान्सचा मिशेल वेलबेक, जर्मनीचा पॅट्रिक सस्किंड, इंग्लंडचा इयान मॅक्इव्हान, अमेरिकेची टोनी मॉरिसन ही कादंबरीकार किंवा ‘फ्रीडम’सारखी कादंबरी लिहिणारा जोनॅथन फ्रिन्झन ही या वीस वर्षांत पुढे आलेली नावे. या साºयांमध्ये अगदी जागतिक क्षितिजावर नाही, पण इंग्लंड-अमेरिकेत आणि आशियात चमकलेली भारतीय नावे म्हणजे अरुंधती रॉय आणि अमिताव घोष. या स्तरावर जाईल आणि नाव घेता येईल असे एक मराठी पुस्तक किंवा लेखक मात्र अद्याप समोर येत नाही. वर उल्लेखलेली नावे आणि मराठी साहित्य यातील तफावत नेमकी कोणती? एक सामान्य सूत्र असे दिसते की, केवळ कथा लिहिणा-याला साहित्यात फार पुढे जाता येत नाही किंवा मान्यता मिळायला उशीर लागतो. बरेच लेखक हे एखाद्या कादंबरीने प्रकाशात येतात. उदा. हारिको मुराकामीने सहज म्हणून एक कादंबरी जपानीत लिहिली. त्याला पुरस्काराची कोणतीच आशा नव्हती. त्याने ती झेरॉक्सही केली नव्हती. पण कादंबरीला बक्षीस मिळाले तेव्हा मुराकामी एक रेस्टॉरंट चालवत होता. त्याने ते बंद केले आणि पूर्णवेळ लेखक व्हायचे ठरवले. त्यानंतर त्याने एकामागून एक अनेक कथा-कादंब-या लिहिल्या. त्याच सुमारास त्याने मॅरेथॉनचा सराव सुरू केला. रोज 20-25 कि.मी. धावायचे असा हा सराव होता. थोडक्यात ही सारी रिस्कच होती, पण त्याने ती घेतली. पॅट्रिक सस्किंड हा खरे तर जर्मन लेखक. त्याने जर्मन भाषेत ‘पर्फ्युम’ ही कादंबरी लिहिली. सुगंधाची विलक्षण संवेदना असणाºया तरुणाची कथा यात येते. तो फ्रान्समध्ये वावरतो आणि त्याच्या संवेदनेचा उपयोग करून अत्तरे बनवू लागतो. पण ते करताकरता त्याचा ‘अल्टिमेट प्युरिटी’ म्हणजे निखळ सुगंधाचा शोध सुरू होतो. असा सुगंध ‘वर्जिन’ तरुणीला येतो, असे वाटल्याने तो अशा तरुणींचे खून करत फिरतो आणि एक दिवस तो पकडला जातो. त्याला जेव्हा जाहीरपणे शिक्षा देण्यासाठी चौकात आणले जाते तेव्हा तो कुपीतून अत्तर वाºयावर सोडतो. त्या सुगंधाचा परिणाम असा होतो की, त्याला सोडून देण्यात येते. मग मात्र तो आत्मनाशाकडे नेणारे अत्तर तयार करतो. या एकाच कादंबरीने सस्किंडकडे जगाचे लक्ष गेले. कादंबरीचे वैशिष्ट्य असे होते की, अत्तर कसे बनते आणि सुगंध तयार करणा-यांचे विश्व कसे असते यांचे अत्यंत बारकाईने चित्रण यात केले आहे. हे करण्यासाठी त्याने अर्थातच बरेच संशोधन केले आहे. काही आधुनिक कादंबºयांमध्ये एखाद्या विषयाचा अभ्यास करून लेखक ते विश्व उभे करतो. विशेषत: अमिताव घोष यांनी हा प्रकार बराच वापरलाय. ‘हिंदू’सारख्या कादंबरीसाठी भालचंद्र नेमाड्यांनी दोनशे वर्षांचा मोरगाव या खानदेशातील गावाचा प्रवास चितारला आहे. या प्रकारातील कादंबरी लिखाणाला वेळ आवश्यक असतो. अमेरिकन कादंबरीकार ब-याचदा या प्रकारे काम करतात. उदा. ‘प्रेस्टिज’सारख्या कादंबरीत जादूगारांचे जग रेखाटताना लेखकाने जादू या प्रकारावर बरेच संशोधन केले आहे हे लक्षात येते. असे लेखन समृद्ध अनुभव देते आणि रंजनही करते. खरेतर मोठे साहित्य कोणते याचे सर्वसाधारण निकष मराठी आणि जागतिक स्तरावर सारखेच आहेत. सूक्ष्मपणे मनुष्य स्वभावाचे वर्णन करणारे, सखोल अनुभव देणारे, त्याचबरोबर चांगली वाचनीयता असलेले. विविध तºहेच्या आणि स्तरावरच्या माणसांचे चित्रण करणारे, विविध प्रकारचे परिसर रेखाटणारे आणि भाषेचा जोरकस वापर करणारे साहित्य हे नेहमीच वरचढ ठरते. 90च्या आधी जागतिक स्तरावर मिलान कुंदेरा, गाब्रियल गार्शिया मार्खेझ, पाब्लो नेरुदा यांसारख्या दिग्गज लेखकांची भाषा आपल्याला परिचित नव्हती. कारण त्यांचे लेखन अनुवादित रूपातच वाचावे लागे. पण या साºयांना समर्थ अनुवादक मिळाले. आपल्याकडे मोठ्या मानल्या गेलेल्या अनेक कथा-कादंबरीकारांना चांगले इंग्रजी येत होते. उदाहरणार्थ, भालचंद्र नेमाडे, जी. ए. कुलकर्णी, गंगाधर गाडगीळ, शांता गोखले. यातील जी. ए. वगळता इतरांनी स्वत:च्या साहित्याचा अनुवाद केला आहे. नेमाडे यांच्या ‘कोसला’चा ‘ककून’ या नावाने अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. ‘रिटा वेलणकर’ या आपल्या कादंबरीचा अनुवाद शांता गोखले यांनी केला आहे. ‘बनगरवाडी’, ‘सावित्री’, जीएंच्या कथा, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, कुसुमाग्रज यांचे साहित्य आता इंग्रजीत उपलब्ध आहे. जागतिक स्तरावरच काय, पण भारतीय स्तरावरही या अनुवादांची दखल घेतली गेलेली नाही. त्या मानाने हिंदी व बंगाली अनुवादाला ब-यापैकी दाद मिळते, असा अनुभव आहे. अपवाद ‘महानायक’ या अनुवादित कादंबरीचा. ही कादंबरी बंगालीत गाजली. एके काळी कॉन्स्टन्स गार्नेट या लेखिका नसलेल्या गृहिणीने फ्योदोर दोस्तोवस्की आणि लिओ टॉल्स्टॉय यांच्या साहित्याचा परिचय इंग्रजीतून जगाला करून दिला. पण भाषेच्या बारकाव्यांमध्ये हे अनुवाद तितकेसे समर्थ नव्हते. त्यामुळे डेव्हिड मगारशॅकसारख्यांनी पुन्हा त्या कादंब-यांचे अनुवाद केले. समर्थ अनुवादक नसल्यामुळे भारतीय साहित्य इंग्रजीत येत नाही, अशी खंत सलमान रश्दी यांनी स्वत: संपादित केलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत व्यक्त केली होती. स्वातंत्र्याला पन्नास वर्षे झाल्याबद्दल हा संग्रह ‘पेंग्विन’ने काढला होता. मार्खेझसारखा लेखक नीटपणे माहीत झाला तो, डेव्हिड ग्रॉसमनसारख्या अनुवादकांमुळेच. अशा अनुवादांसाठी भरपूर वेळ आणि पैसा यांची गरज असते. साहित्य संमेलनासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असताना याहीसाठी थोडा पैसा खर्च व्हायला हरकत नाही.