दशक परभाषिक Bookmark and Share Print E-mail
शशिकांत सावंत - रविवार, २३ जानेवारी २०११
२१ व्या शतकातील संपलेल्या पहिल्या दशकाचे वर्णन अनेक प्रकारे करता येईल. माहितीच्या विस्फोटाचे दशक म्हणून किंवा जीवनावर मीडियाचा अतिरिक्त प्रभाव टाकणारे दशक म्हणूनही! वाचनसंस्कृतीच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचे दशक होते. दशकाची सुरुवात झाली तीच मुळी पुस्तकांच्या भवितव्याविषयीची चिंता घेऊनच. कारण याचदरम्यान इंटरनेटचा प्रसार मोठय़ा प्रमाणावर होत होता. मोबाइल महाग असूनही लोकप्रिय होत होता. शेकडो नवनवी चॅनल्स येत होती. २००० मध्ये स्टीफन किंग याने आपली कथा इंटरनेटवर विकली. लाखोंनी ती डाऊनलोड केली. किंगला त्यामुळे पसा, प्रसिद्धी मिळाली. पण तो म्हणतो- ‘कथा कशी आहे, याबद्दल कोणीच बोलत नव्हते. मीही ती कितीजणांनी वाचली, हे विचारले नाही. कारण माझी निराशाच होईल, याची खात्री होती.’ या अशा स्थितीत कागदावर छापलेल्या मजकुराची मातब्बरी कमी होण्याची चिन्हे होती. पुस्तकांचा खप कमी होत होता.
परंतु आता दशक संपताना काय दिसते? कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात नजर टाका- हजारो पुस्तके आजही प्रकाशित होत आहेत. चरित्रे, आत्मचरित्रांचा किंवा पर्ल फिक्शनचा खप वाढतो आहे. नवनवे लेखक येत आहेत. हे दशक संपताना ‘गर्ल विथ ड्रॅगन टॅटू’ कादंबरी गाजते आहे. स्टीग लार्सन या स्वीडिश पत्रकाराने ही तीन पुस्तकांची रहस्यमालिका लिहून ठेवली. केवळ वेळ घालविण्यासाठी तो ती लिहीत होता. वयाच्या पन्नासाव्या वर्षी तो मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर ही पुस्तके प्रसिद्ध झाली. आता ती सर्वोच्च खपाच्या यादीत अग्रक्रमी आहेत. वाचनाची आवड कमी होतेय, म्हणता म्हणता हॅरी पॉटर मालिका, ‘लॉर्ड ऑफ द िरग’ ही महाकाव्यात्मक कादंबरी सध्या विक्रीच्या बाबतीत अग्रक्रमी आहे. (काही वर्षांपूर्वी ‘अक्षर’ दिवाळी अंकात रमेश सरकार यांनी तिचे वाङ्मयीन महत्त्व सांगणारा लेख लिहिला होता.) ही कादंबरी कॉलेज तरुणांच्या हातात कधी दिसेल असे वाटले नव्हते.
मोबाइल, टीव्ही, इंटरनेटवरील फेसबुक, ऑर्कुट वगरे विविध प्रकारच्या मीडियामुळे माणसाच्या दैनंदिन जीवनातला फुरसतीचा वेळ कमी कमी होत गेला. हाच वेळ खरं तर वाचन, गप्पा, मनोरंजनासाठी वापरला जातो. या माध्यमांनी माणसांची व्यग्रता वाढविली, तसतसा सुटसुटीत, फँटसी असलेल्या, दैनंदिन जीवनापासून दूर नेणाऱ्या पलायनवादी साहित्याच्या वाचनाकडे त्यांचा कल वाढला, असे या तिन्ही पुस्तकांच्या खपावरून म्हणता येते.
पण याच्या अगदी उलटही- गंभीर साहित्य आणि नॉन-फिक्शन पुस्तकांचाही खप वाढला आहे. याला कारण- वाचन हा ज्यांचा कच्चा माल आहे- असा मोठा वर्ग समाजात असतो. उदाहरणार्थ- सिनेक्षेत्रातील लोक, आíकटेक्ट, चित्रकार, शास्त्रज्ञ, पत्रकार, प्राध्यापक इत्यादी. त्यामुळे विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, सिनेमा या क्षेत्रांत पुस्तकांचा मोठा खप दिसतो. उदा. सिनेमाच्या क्षेत्रात लेखक म्हणून धडपडणाऱ्यांना सिड फिल्ड या लेखकाची पटकथालेखनावरची पुस्तके किंवा ‘स्टोरी’सारखे स्टीव्हन मॅकीचे पुस्तक वाचणे जरुरीचे झाले आहे. तसेच दिग्दर्शकांना ‘प्रोजेक्शन’ हे दिग्दर्शकांच्या मुलाखतींचे खंड (१२), आíकटेक्ट मंडळींना इंटेरिअर, गृहरचना, विविध बांधकामे आणि जुन्या फ्रॅन्क लॉयड राईटपासून आताच्या कलत्रावा, फ्रॅन्क यांच्या कामावरची पुस्तके वाचून, चाळून अद्ययावत राहणे अपरिहार्य झाले आहे.
नॉन-फिक्शन प्रकारातही विविध क्षेत्रांतील मंडळींनी आपल्या क्षेत्रातील गोष्टींवर सर्वसामान्यांसाठी लिहिलेल्या पुस्तकांकडे वाचकांचा ओढा वाढला आहे. स्टीफन हॉकिंगचे कोटय़वधी प्रती खपलेले ‘ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम’ हे खगोलशास्त्रावरचे पुस्तक याची साक्ष देते. ‘न्यूयॉर्कर’ साप्ताहिकात वैद्यक विषयावर लिहिणारे अतुल गवांदे यांची ‘कॉम्प्लिकेशन्स’, ‘बेटर’, ‘चेकलिस्ट मॅनिफेस्टो’ ही पुस्तके गेल्या चार-पाच वर्षांत प्रसिद्ध झाली आहेत. डॉक्टर होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकता शिकता अनेक चुकांना सामोरे जावे लागते. चुका कशा होतात आणि त्या टाळण्यासाठी काय करावे, हे सांगणारा ‘व्हेन डॉक्टर्स मेक मिस्टेक’ हा त्यांचा लेख ‘न्यूयॉर्कर’मध्ये प्रसिद्ध झाला. त्यावर ‘लँसेट’ या वैद्यक जर्नलने संपादकीय लिहिले आणि गवांदे यांचे नाव जगभर पोहोचले. हा लेख ‘कॉम्प्लिकेशन्स’ या पुस्तकात आहे. त्यानंतर वजन कमी करण्यापासून ते हृदयरोगावरच्या इलाजापर्यंत वैद्यक क्षेत्रात चाललेल्या वैविध्यपूर्ण गोष्टी वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या शैलीत त्यांनी लिहिल्या आणि त्यांचे हे लेखन चांगलेच लोकप्रिय झाले. हे दशक संपताना ‘टाइम’ साप्ताहिकाने जगातील प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या यादीत त्यांना पाचवा क्रमांक दिला आहे.
ऑलिव्हर सॅक्स हे लेखक मेंदूमुळे झालेल्या विकाराने मानवी क्षमतांवर काय परिणाम होतो, यावर लिहीत आले आहेत. त्यांचे ‘म्युझिको फिलीया’ या पुस्तकात त्यांनी अपघात झाल्यावर अचानक सांगीतिक रचना करण्याची क्षमता वाढलेले किंवा मेंदू आणि संगीत यांचे नाते दाखविणारी बरीच उदाहरणे दिली आहेत. सॅक्स यांची या विषयावरची ‘मायग्रेन’, ‘मॅन हू मिस्टूकहिज वाइफ फॉर अ हॅट’, ‘अंकल टंगस्टन’ अशी बरीच पुस्तके लोकप्रिय आहेत. ‘अंकल टंगस्टन’ प्रामुख्याने रसायनशास्त्राची त्यांची ओढ आणि त्यातून आलेले अनुभव यावर आधारीत आहे. अपघाताने हात गेलेल्या माणसांना अनेकदा तो अवयव आहेच असा भास होतो. या समस्येवर व्ही. रामचंद्रन या न्युरोसायन्टिस्टने काम केले. त्यानंतर त्यांनी लिहिलेले पुस्तक ‘फँटम्स इन द ब्रेन’ हेही लोकप्रिय झाले. यात त्यांनी आपल्याला सौंदर्यपूर्ण वाटणाऱ्या गोष्टी या सुंदर का वाटतात, याचे उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे. पण सौंदर्यशास्त्रावर लिहिणाऱ्यांनी याची फारशी दखल घेतलेली नाही.
८०-९० च्या दशकात मिलान कुंदेरा, गॅब्रियल गार्सयिा माक्र्वेझ, गुंटर ग्रास असे अनेक लेखक लोकप्रिय होते. या दशकातही त्यांची नवी पुस्तके आली. छोटय़ा-मोठय़ा कादंबऱ्या, आत्मचरित्राचा खंड प्रसिद्ध झाला. गुंटर ग्रासचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. कुंदेराच्या ‘स्लोनेस’ वगरे कादंबऱ्या आणि दोन-तीन निबंधसंग्रह प्रसिद्ध झाले. पण ८०-९० मधील कादंबऱ्यांप्रमाणे त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे त्यांची जागा घेतील इतके मोठे लेखक कोण, याचेही उत्तर मिळालेले नाही. ओरहान पामुक आणि हरिकू मुराकामी हे या दशकातच लोकप्रिय झालेले दोन लेखक. पामुक नोबेल पारितोषिकामुळे सर्वत्र पोहोचले. धनाढय़ कुटुंबात जन्मलेल्या, आधुनिक वातावरणात वाढलेल्या पामुक यांनी ‘स्नो’, ‘माय नेम इज रेड’मधून रंगविलेले तुर्की मानसिक संघर्षांचे चित्रण सर्वसामान्य वाचकांना नक्कीच भिडेल. त्याच्या कादंबरीची पहिली आवृत्ती लाखावर छापली जात असे. आता त्यांचे इंग्रजी अनुवादही खपत आहेत. जपानी हरिकू मुराकामी यांनीही सहज म्हणून लिहिलेली कादंबरी स्पध्रेत पाठविली. तिला पुरस्कार मिळाल्यावर त्यांनी लेखक व्हायचे ठरवले. आपले चालणारे रेस्टॉरंट त्यांनी बंद केले आणि ते नियमित लेखन करू लागले. त्याच सुमारास त्यांनी मॅरथॉन धावायला सुरुवात केली. कथा-कादंबऱ्यांबरोबरच या धावण्याबद्दलही त्यांनी पुस्तक लिहिले. ‘काफ्का ऑन द शोअर’ ही त्यांची कादंबरी जपानमधे लोकप्रिय झालेली पहिली कादंबरी. ‘वेस्ट ऑफ द सन’ या त्याच्या कादंबरीत मध्यम वयात लग्न करून स्थिरावलेला नायक सतराव्या वर्षी प्रेमात पडलेल्या प्रेयसीला भेटतो. भेटी वाढत जातात आणि त्याचे सुखी, सरळ आयुष्य तणावाचे बनते. अशा प्रकारच्या कथा अनेकदा साहित्यात आल्या आहेत. पण मुराकामीचे वेगळेपण असे की, ही कादंबरी आत्मिक संबंधांवर जास्त काही सांगते. गूढता अणि असंगत घटना हा त्याच्या शैलीचा एक विशेष आहे.
यांच्याबरोबरच गंभीर साहित्य लिहिणारे अनेक लेखक या दशकात लोकप्रिय झाले. भारतीय वंशाचे सलमान रश्दी, अमिताव घोष, ब्रिटिश लेखक इवान मॅकहुवान, अमेरिकन टोनी मॉरिसन, जोनाथन फ्रेंझन किंवा जुने फिलीप रॉय, जॉन अपडाईक, लॅटिन अमेरिकन जोस सारामांगो, रॉबर्ट बोलाने, मारिओ वर्गास योसा किंवा उंबटरे एको, इटालो कॅल्विनो हे इटालियन लेखक इत्यादी. जोनाथन फ्रेंझनची ‘फ्रीडम’ ही कादंबरी ‘द ग्रेट अमेरिकन नोव्हेल’ म्हणून प्रसिद्ध झाली. जोनाथन फ्रेंझन ‘टाइम’च्या मुखपृष्ठावर झळकले. (कव्हरवर येणारे ते सातवे लेखक!) कादंबरी खपलीही चांगली. पण टीकाकारांनी तिचे फारसे कौतुक केले नाही.
एका वाक्यात ज्याची कथा सांगता येते अशा सिनेमांना हॉलिवूडमध्ये ‘हाय कन्सेप्ट मूव्ही’ म्हटले जाते. अशा एका कल्पनेवर आधारीत ‘इन्टिमसी’, ‘द रीडर’, ‘पफ्र्युम’ या कादंबऱ्या लोकप्रिय ठरल्या. पुन्हा त्यांच्यावर सिनेमेही निघाले. यापैकी ‘पफ्र्युम’ ही कादंबरी खिळवून ठेवणारी आहे. वास घेण्याची विलक्षण क्षमता असलेल्या नायकावर ती आधारीत आहे. पॅट्रिक सिस्कड या जर्मन लेखकाची फ्रान्समध्ये घडणारी ही कादंबरी. तर हनिफ कुरेशी यांची कादंबरी बायको आणि दोन मुलांना सोडायचा निर्णय घेतलेल्या नायकाचे मानसिक द्वंद्व चितारणारी. मात्र या कादंबऱ्या कादंबऱ्याच आहेत, वाढवलेल्या कथा नाहीत. घरातील खाद्यपदार्थानी खच्चून भरलेला फ्रिज उघडताना ‘इंटिमसी’चा नायक म्हणतो, ‘या मध्यमवर्गाला सगळं कसं विपुल प्रमाणात लागतं ना!’ चांगल्या कादंबऱ्या दीर्घसूत्री परिणाम करतात. जीवनविषयक दृष्टिकोन देतात. आपल्या निरीक्षणाने अवाक् करतात. पुन: पुन्हा आपल्याकडे ओढून नेतात. मला स्वतला मिशेल वेलबेक यांच्या ‘अॅटोमाइज्ड’, ‘प्लॅटफॉर्म’, ‘लोंझोरोट’ या तिन्ही कादंबऱ्यांनी हा अनुभव दिला. एकविसाव्या शतकातील माणसाचा फ्रीकनेस, क्षणभंगुरपणा आणि तरीही असलेली जीवनाची ओढ, भांडवलशाही मीडियाने केलेले आक्रमण या साऱ्याबद्दल नीटपणे लिहिणारा तो लेखक आहे. ‘अल्बेर काम्युचा वारसदार’ असे त्याचे वर्णन केले गेले आहे.
लेखक साहित्यातून जीवनाचा शोध घेत असतो. सामान्य माणूस हा शोध घेताना सुखाच्या शोधाकडे वळतो आणि त्याबद्दल सांगणारी ‘सेल्फ हेल्प’ तसेच आध्यात्मिक पुस्तके यांचाही खप फार मोठा आहे. पाऊलो कोहलो यांच्या ‘अलकेमिस्ट’ कादंबरीने त्यामुळेच अफाट लोकप्रियता गाठली. पुस्तक कादंबरीच्या स्वरूपात असले तरी ते जिब्रानच्या ‘प्रॉफेट’ किंवा जोनाथन लििव्हग्स्टन सीगलच्याच प्रकारातले हे पुस्तक आहे. ‘द सिक्रेट्स’, ‘यु कॅन हिल युवर लाइफ’ ही या प्रकारातली लोकप्रिय पुस्तके. ‘सिक्रेटस’ने अनेकांना स्फूर्ती दिली. स्टीव्हन कोवीचे ‘सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल’ हे पुस्तकही व्यवस्थापनापेक्षा ‘सेल्फ हेल्प’कडेच अधिक झुकते. ‘चिकन सूप’ची मालिकाही यात आली.
दशकाच्या सुरुवातीला आलेली ‘सोफीज् वर्ल्ड’ ही नार्वेजियन कादंबरी प्रत्यक्षात तत्त्वज्ञानाचा सोप्या रूपात परिचय करून देणारी होती. सोफी या मुलीला पत्रे येतात. त्यात तिला काही प्रश्न विचारलेले असतात. उदा. घोडे आणि बिस्किटे यांत साम्य काय? तर- संकल्पना! या कादंबरीचा ५५ भागांत अनुवाद झाला आणि तिच्या तीन कोटी प्रती खपल्या. ‘विट्गेन्स्टाईन्स पोकर’ हे तत्त्वज्ञानावरचे पुस्तक असेच लोकप्रिय झाले. या पुस्तकात विसाव्या शतकातील दोन प्रसिद्ध तत्त्वज्ञ लुडविग विट्गेन्स्टाईन्स आणि कार्ल पॉपर यांच्या केंब्रिज विद्यापीठातील निबंधवाचनाच्या सत्रात झालेले भांडण केंद्रस्थानी आहे. या प्रसंगापासून सुरुवात करून लेखक दोघांचे चरित्र, तत्त्वज्ञानातले कार्य आणि विसाव्या शतकातील तत्त्वज्ञान यांचा वेध घेतात.
इंग्रजीमध्ये तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र, संरचनावाद, उत्तर-आधुनिकता अशा विषयांवर वाचकांची चिकाटी आणि तीव्रतेला पुरेल अशा विविध कॅप्सुल्समध्ये त्या-त्या आकाराची आणि फॉर्मॅटमधली पुस्तके उपलब्ध असतात. कॉमिकच्या स्वरूपातील ‘पोस्ट-मॉर्डनिझम फॉर बीगिनर्स’, ‘फुको फॉर बीगनर्स’ ही मिशेल फुको या तत्त्वज्ञाचे कार्य समजावून सांगणारी पुस्तके उपलब्ध आहेत. मिशेल फुको, क्लॉड लेवी स्ट्रॉस, कार्ल पॉपर, एडवर्ड सईद हे तत्त्वज्ञ विसाव्या शतकात मरण पावले. मात्र त्यांच्या अप्रकाशित लेखनाची पुस्तके आजही येत आहेत. ‘ऑल लाइफ इज प्रॉब्लेम सॉिल्वग’सारख्या कार्ल पॉपर यांची भाषणे आणि लेखांच्या संग्रहातील ‘हाऊ आय बिकम फिलॉसॉफर विदाऊट ट्राइंग’सारखा लेख वाचला तरी विचारवंत कसा असतो, याचे दर्शन होते. लहानपणापासून आपल्याला ‘अनंत म्हणजे काय?’ यासारखे प्रश्न पडत होते. ‘हे प्रश्न म्हणजेच तत्त्वज्ञानातील प्रश्न,’ असे सांगून पॉपर पुढे ‘समाजविज्ञान आणि खरे विज्ञान’ यांतील फरकाची समस्या सोडविण्यापर्यंत आपण कसे आलो, ते सांगतात. स्टीफन मॅकगव्हर्न यांचे ‘ऑन बिकिमग अ फिलॉसॉफर’, ब्रायन मॅगी यांचे तत्त्वज्ञांशी संवादाची पुस्तके ही आपल्याला तत्त्वज्ञानाच्या परीघावरून मध्यापर्यंत न्यायचा प्रयत्न करतात. तर जर्गन हेबरमास, गाईल्स डिल्युझ, जॅकस् देरीदा, ल्योटोर, नाओम चॉमस्की, बॉब्रीलार्ड अशा विचारवंतांची पुस्तके आजही नियमितपणे प्रसिद्ध होतात. राजकारण, कला, प्रसारमाध्यमे या विषयांवर सातत्याने केलेल्या चिंतनाचा परिपाक त्यात दिसतो. या मांदियाळीत अमर्त्य सेन, होमी के. भाभा ही दोन ठसठसीत भारतीय नावे आहेत.
रिचर्ड डॉकिन्स हे डार्वनिवादी लेखक, स्टीफन जे. गोल्ड हे जीवाश्मशास्त्रज्ञ, कार्ल सागान, पॉल डेव्हिस या विज्ञानविषयक लेखकांना त्यांचा असा वाचकवर्ग आहे. या दशकात त्यांची प्रत्येकी पाच-सहा पुस्तके आलेली दिसतात. रिचर्ड डॉकिन्स यांचे ‘गॉड डिल्युजन’, ख्रिस्तोफर हिचेन्स संपादित ‘गॉड इज नॉट ग्रेट’, करेन आर्मस्ट्राँग यांचे देवाच्या अस्तित्वावरचे पुस्तक ही तिन्ही पुस्तकं गेल्या वर्ष- दोन वर्षांत चच्रेत होती. पण देवाच्या अस्तित्वाबद्दल वाचकांना फारशी शंका नसावी. पुस्तकांच्या दुकानात धर्मावर आधारलेली पुस्तके भरपूर खपताना आढळतात. कृष्णमूर्ती, गुर्जीफ, कास्टानेडा, ओशो, रामकृष्ण, विवेकानंद, श्री रवीशंकर, योगानंद असे ज्याच्या-त्याच्या ब्रॅण्डच्या श्रद्धेला दिशा देणारे लेखक सतत खपत असतात. झेन बुद्धिझम, ताओइझम्, इस्लाम, ख्रिश्चॅनिटी या साऱ्यांवर नवनवी पुस्तके येत असतात.
९/११ च्या हल्ल्यानंतर दहशतवाद, मंदीनंतरचे अर्थकारण आणि चीनची प्रगती हे या दशकात नव्याने पुस्तकाला चालना देणारे विषय ठरले आहेत. दहशतवादावरचे ‘तालिबान’, आर्थिक मंदीवर चेस्टीगलिझ यांचे ‘फ्री फॉल’, चीनवरचे जॉन के, मार्गारेट मॅक्मिलन, राजकुमार झा यांची पुस्तके खपली. थॉमस फ्रीडमनसारख्या पॉप विचारवंताचाही उदय ‘लेक्सस अॅन्ड ऑलिव्ह ट्री’, ‘वर्ल्ड इज फ्लॅट’मुळे झाला.
दशक संपताना पेंग्विनने ३७ पुस्तकांचा एक संच प्रत्येकी केवळ १९९ रुपये दराने उपलब्ध केला आहे. ‘लोलिता’, ‘सेन्स अॅन्ड सेन्सिबिलिटी’ अशा फिक्शनबरोबरच त्यात ‘हाऊ लँग्वेज वर्क्स’- डेव्हिड क्रिस्टल, ‘लँग्वेज इिन्स्टक्ट’- स्टीव्हन िपकर, ‘एम्पायर’- निआल फग्र्युसन या पुस्तकांचा समावेश होतो. फग्र्युसन यांचेही पशाचा उगम आणि विकासाचा इतिहास सांगणारे ‘अॅसेंट ऑफ मनी’ हेही दशकातील एक बेस्ट सेलर पुस्तक आहे.
अर्थात एका लेखात दशकातील पुस्तकांचा आढावा घेणे शक्य नाही. केवळ प्रभावी, खप होणारे, लोकप्रिय असे वेगवेगळे निकष या निवडीकरता लावता येतील. पण त्यात फिक्शन, क्राइम थ्रीलर प्रकारात टॉम क्लॅन्सी, जॉन ल कार, फ्रेडरिक फोरसाईथ, रुथ रँडल या जुन्या लेखकांची लोकप्रियता अबाधित आहे. जोनाथन केलरमन, ली चाइल्ड, अलेक्झांडर मॅकॉथ स्मिथ यांसारख्या लेखकांची त्यात आता भर पडली आहे. सायन्स फिक्शनमध्ये मात्र वाचक आर्थर साक्लार्क, आयझ्ॉक अॅसिमोव्ह हे लेखक अजूनही वाचले जातात. त्यात आणखी नवीन भर पडलेली नाही. बुकरसारख्या पुरस्कारामुळे अरिवद अडीगा, किरण देसाई इत्यादी लेखक लोकप्रिय झाले. बुकरमुळे पुस्तकाच्या खपाला चालना मिळते. पण या दशकात नोबेल पारितोषिक मिळविणारे हेर्टा मिलर, जॉ मारी गुस्ताव, ले क्लॅझिओ, एफ्रीड जेलीनिक, इम्रे कर्तीज असे कितीतरी लेखक फारसे वाचले जात नाही.
टेड ह्युजेसचा ‘लाइफ लेटर्स’ हा पत्नी सिल्विया प्लॉथबरोबरच्या नात्यासंबंधांतील कवितांचा संग्रह, डेरेक वॉलकॉटची ‘बाऊंटी’, तसेच रॉबर्ट लॉवेल, अॅलन गिन्सबर्ग, होर लुई होरेस, पॉल सेलान, फिलिप लाíकन्स, पाब्लो नेरुदा यांच्या समग्र कवितांचे खंड या दशकात प्रसिद्ध झाले. अरुण कोलटकरांचा ‘काला घोडा पोएम्स’ हा संग्रह प्रसिद्ध झाला. सिल्विया प्लॉथ यांनी आत्महत्या केल्यावर टेड ह्युजेस यांनी कधी आरोप-प्रत्यारोपांना उत्तर दिले नाही. पण हा संग्रह त्यांच्या नात्याच्या उबदारपणाचा प्रत्यय देतो.
या दशकात भारतीय लेखकांनी मोठय़ा प्रमाणावर इंग्रजीत पुस्तके लिहिली. ‘इंडियन रायटिंग’ या शीर्षकाखाली पुस्तकांच्या दुकानात भरमसाठ पुस्तके दिसतात. ‘मॅक्सिमम सिटी’ हे त्यातले महत्त्वाचे पुस्तक. अरुंधती रॉय यांची नवी कादंबरी पार पडली असली तरी त्यांनी लिहिलेले निबंधसंग्रह आणि ‘शेप ऑफ द बीस्ट’ हे मुलाखतींचे पुस्तक देशापुढील प्रश्न समजावून घेणाऱ्याला वाचावेच लागेल. रामचंद्र गुहा यांचे ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे भारतावरचे आणखी एक महत्त्वाचे पुस्तक. गेली अनेक वष्रे उपलब्ध असलेले ‘हिस्ट्री ऑफ इंडिया’ हे रोमिला थापरचे पुस्तक अलीकडे पुनíलखित स्वरूपात पुन्हा प्रसिद्ध झाले आहे. व्ही. एस. नायपॉल यांचे इस्लामी देशांच्या प्रवासावरील आधारीत ‘बीयाँड बीलिफ’ आणि इतर पुस्तके या दशकात आली. नोबेल पारितोषिक आणि संशोधनपर चरित्र यांनी एक मोठा लेखक म्हणून त्यांना प्रस्थापित केले. विध मेहतांचा १८ पुस्तकांचा संच आता उपलब्ध झाला आहे.
विविध चॅनेल्सच्या प्रभावामुळे वन्यजीवन, तसेच अवकाशाबद्दलचे कुतूहल रंगतदारपणे पुरविणारी कॉफी टेबल पुस्तकेही मोठय़ा प्रमाणावर येत आहेत. आज अगदी २ ७ ३ फुट आकाराची पुस्तकेही उपलब्ध आहेत. या आकारातील छायाचित्रांमुळे कलत्रावासासारखे आíकटेक्ट किंवा हबलने घेतलेली छायाचित्रे यांना वेगळेच मोल प्राप्त होते.
मात्र, या दशकात बिल िक्लटन, मार्गारेट थॅचर, ओबामा, जॉर्ज बुश या सर्वानी आत्मचरित्रे लिहिली. पुस्तक लिहिणे हा अमर होण्याचा मार्ग आहे, असे अनेक नेत्यांना वाटते. ओबामा यांना नेता म्हणून प्रस्थापित करण्यात पुस्तकांचा मोठा वाटा आहे. पंचवीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले ‘शुअर्ली यु आर जोकिंग मिस्टर फेनमिन!’ हे तऱ्हेवाईक जीनिअस भौतिकी शास्त्रज्ञ रिचर्ड फेनमिन यांचे आत्मचरित्र या दशकातले ‘कल्ट’ पुस्तक मानायला हरकत नाही. फेनमिन यांची इतरही पुस्तके या दशकात आली. त्यांचे सहप्रवासी डेव्हिड बोम यांची भौतिकशास्त्रावरची पुस्तके आणि नुकतेच आलेले स्टीफन हॉकिंगचे ‘ग्रँड डिझाइन्स’ ही क्वांटम फिजिक्स, िस्टग थिअरी, भौतिकशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयांतील लोकांची रुची वाढत असल्याचे दर्शवतात. ती वाचणाऱ्यांना सामान्य वाचक म्हणता येईल का, ही शंका आहे. दशक संपताना ‘किंडल’ हे पुस्तक वाचण्याचे इलेक्ट्रॉनिक साधन नव्या पिढीत लोकप्रिय झाल्याचे दिसते.
..तर प्रामुख्याने सामान्य वाचकाच्या दृष्टीतून घेतलेला हा या दशकातील जागतिक पुस्तकांचा आढावा! अशा आढाव्यातून कितीतरी मोठी पुस्तके किंवा लेखक निसटू शकतात. ‘आयरिस’ हे जॉन बेली यांचे आणि ‘प्रोफेसर अॅन्ड मॅड मॅन’ ही दोन व्यक्तिगत पसंतीची पुस्तके कुठल्याच यादीत टाकता येत नाहीत. ‘आयरिस’ हे आयरिस मडरेकशी परिचय झाल्यापासून तिला अल्झायमर झाल्याच्या दिवसांपर्यंत चित्रण करणारे पुस्तक; तर ‘प्रोफेसर अॅन्ड मॅड मॅन’ हे ७० वष्रे ऑक्सफर्ड डिक्शनरी बनविण्याचे काम कसे चालले, याची रसाळ कहाणी सांगणारे पुस्तक. तर शेवटी महत्त्वाच्या पुस्तकांची ही यादी- १) २६६६- रॉबर्ट बॉलेनो, २) होरे लुई होरेस- समग्र कथा, ३) काला घोडा पोएम्स, ४) कलेक्टेड पोएम्स- अॅलन िगसबर्ग, ५) पफ्र्युम- पॅट्रिक सस्कींड, ६) सोफीज् वर्ल्ड, ७) विट्गेस्टाईन पोकर, ८) ऑल लाइफ इज प्रॉब्लेम सॉिल्वग, ९) काफ्का ऑन द शोअर- हरिकू मुराकामी, १०) हाऊ टू बी अलोन, ११) इंटरेिस्टग टाइम्स- एरिक हॉब्सवाम, १२) गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू, १३) जीनिअस- जॉन ग्रीबीन, १४) लाइव्हज ऑफ मिशेल फुको, १५) अॅटोमाइज्ड- मिशेल वेलबॅक, १६) आयरिस- जॉन बेली, १७) प्रोफेसर अॅन्ड मॅड मॅन- सिमॉन िवचेस्टर, १८) अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ निअर्ली एव्हरीिथग- बिल ब्रायसन, १९) इंटिमसी- हनिफ कुरेशी, २०) हॅरी पॉटर मालिका, २१) बुद्ध- करेन आर्मस्ट्राँग, २२) ग्रँड डिझाइन- स्टीफन हॉकिंग, २३) मॅक्सिमम सिटी- सुकेतू मेहता, २४) आर्गुमेंटिव्ह इंडियन- अमर्त्य सेन, २५) शॉक ऑफ द न्यू- रॉबर्ट ह्युजेस.
Sunday, February 20, 2011
Subscribe to:
Posts (Atom)